अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांच्यापुढे मी सामान्य समाजसेवक आहे. त्यांच्यातील व माझ्यातील असणारे मतभेद १५ वर्षांपूर्वीच संपुष्टात आले होते. त्यांची मी भेटही घेतली होती असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बबनराव घोलप यांनी येथे आज पत्रकार परिषदेत सांगितले. गारपिटीमुळे राज्यातील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याने लोकसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, त्यास आपला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.
   हजारे हे घोलप यांच्या विरोधात प्रचार करणार या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. लोकशाहीत प्रत्येकाला काय करावे याचे स्वातंत्र्य असते. अण्णा व माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. झालेले वाद मिटलेले आहेत. त्यांनी कोणाचा प्रचार करावा किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल माझा कोणताही रोष नाही असे घोलप यांनी स्पष्ट केले. कोपरगाव तालुक्याला मिळणारे हक्काचे ११ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे याबाबत त्यांनी सहमती दर्शविली. तालुक्याचे प्रलंबित प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यावर आपला भर राहील. मला सर्व स्तरावर पाठिंबा मिळत असून वाकचौरे यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल. सत्तेतील काँग्रेस पक्षच मोठा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचे विविध घोटाळय़ांवरून दिसते. त्याबाबत हजारे यांनी बोलावे असे आव्हान सेनेचे आमदार अशोक  काळे यांनी त्यांना दिले. कोपरगाव तालुक्यातील चासनळी, मंजूर, धामोरी, नाटेगाव, टाकळी आदी परिसरातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. त्याचे झालेले कोटय़वधीचे नुकसान भरून न निघणारे आहे. त्यांना केंद्र शासनाने भरीव व त्वरित मदत द्यावी म्हणून घोलप यांनी मागणी केली.
    पत्रकार परिषदेस उत्तर नगरप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, कैलास जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब बारहाते आदी उपस्थित होते. नंतर कृष्णाई मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात आमदार बबनराव घोलप अशोक काळे यांनी मार्गदर्शन केले.