”मला खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष व्हायचे नाही. साखर कारखान्याच्या कारभाराबाबत येथील शेतकरी व कार्यकर्ते सातत्याने माझ्याकडे तक्रारी करत होते. स्थानिकांनी सर्वांनी एकत्र येत मला कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय सांगितला. खंडाळातील शेतकऱ्यांची या कारखान्याच्या अध्यक्षांनी दिशाभूल केली.” असा आरोप आमदार मकरंद पाटील यांनी केला.

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी काल पारगाव येथे मयूर मंगल कार्यालयात आमदार पाटील व व्ही. जी. पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त झालेल्या जाहीर प्रचार सभेत आमदार पाटील बोलत होते.

यावेळी खंडाळा साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष व ज्ञानदीप परिवाराचे संस्थापक व्ही. जी. पवार, ज्‍येष्ठ नेते बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे खंडाळा तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा काँग्रेसचे चंद्रकांत ढमाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मनोज पवार, ऍड.शामराव गाढवे, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, माजी सभापती एस. वाय. पवार, रमेश धायगुडे-पाटील, जिल्हा कोविड समन्वय समितीचे सदस्य डॉ. नितीन सावंत, हणमंतराव साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, खंडाळा कारखाना उभा करण्यासाठी जेवढा खर्च आला, त्यापेक्षा अधिक पटीने कारखान्यावर कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. आज खंडाळा कारखान्यावर २५० कोटींचे कर्ज आहे. खंडाळा कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांचा वडिलधारी व माझ्या वडिलांचे मित्र म्हणून आदर आहे. आमच्याकडून अनादर होणार नाही, ती आमची संस्कृतीही नाही. मला या कारखान्याचे अध्यक्ष व्हायचे नाही. ऊस गेला नाही, बिले मिळाली नाहीत, साखर मिळाली नाही, येथील शेतकरी सातत्याने माझ्याकडे तशा तक्रारी करत होते.
लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या तक्रारींची दखल घेण्याची माझी जबाबदारी आहे. त्यामुळेच मी कारखान्याकडे लक्ष घातले आहे.

रामतीच्या घशात हा कारखाना घालण्याचा प्रचार केला जातोय. मात्र, विरोधच करायचाच असता तर गेल्या वर्षी ३२ कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळाल्यावर किसन वीर भुईंज कारखाना डिसेंबरमध्ये सुरू झाला. त्यावेळीच हे पैसे मिळून दिले नसते. किसन वीर, खंडाळा व प्रतापगड मिळून एक हजार १५ कोटींचे कर्ज आहे. त्यामध्ये किसनवीरवर ७५० कोटी तर खंडाळ्यावर २५० कोटींचे कर्ज आहे. कामगारांचे पगार, हजारो शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. हा कारखाना खासगी कारखानदारांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. भविष्यात हा कारखाना सुरळीत चाललेला दिसेल, चांगला दरही मिळेल असे सांगून आमदार पाटील यांनी शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही केले.