महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं त्यासाठी मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. कारण उद्धव ठाकरे हे जर चुकीचं वागले नसते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींचा श्वास शिवसेनेत गुदमरला नसता. त्यामुळे हा जो वेगळा प्रयोग झाला त्या प्रयोगात मी मुख्यमंत्री होणार नाही हे मला पहिल्या दिवसापासून माहित होतं. मी उपमुख्यमंत्री होणार हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. तो निर्णय मला त्या दिवशी देण्यात आला. मला घरी जा सांगितलं असतं तरीही मी गेलो असतो. पण मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. त्यामुळे सुरूवातीला मी थोडे आढेवाढे घेतले पण पक्षाचा निर्णय मी मान्य केला असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमातल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर मुख्यमंत्री तुम्हीच होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण तुम्ही मुख्यमंत्री झाला नाहीत तर उपमुख्यमंत्री झालात त्याबद्दल काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सर्वात आधी उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो. कारण ते जे वागले त्यामुळेच हे सरकार येऊ शकलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की मी पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही हे मला पहिल्या दिवसापासून माहित होतं. मुख्यमंत्री होणार नाही याबद्दल मला काहीही अडचण नव्हती. मात्र मला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे हे मला शेवटच्या क्षणी समजलं. मुख्यमंत्री न होणं हा माझाच निर्णय होता. ज्यावेळी हे सगळं घडलं तेव्हा मुख्यमंत्री पद आपण आपल्याकडे घेऊ नये हे मी पक्षाला सांगितलं होतं. तो निर्णय स्वीकारण्यास पक्षाला काही काळ लागला. “

मी सरकारच्या बाहेरच राहणार होतो


मी सरकारच्या बाहेर राहूनच पक्ष मजबूत करायचं असं ठरवलं होतं. मात्र आमच्या नेत्यांनी मला उपमुख्यमंत्री व्हायला शेवटच्या क्षणी सांगितलं. मी पक्षाचा एक सैनिक आहे. त्यावेळी निश्चित माझ्या मनात थोडं वाटून गेलंच. पण पक्षाने सांगितलेला आदेश मोठा आहे त्यापुढे काहीही नाही. मला त्यांनी घरी जायला सांगितलं असतं मी घरी बसलो असतो. माझ्या पक्षामुळेच मी इथवर वाटचाल केली आहे. आमच्या नेत्यांनी मला सांगितलं की बाहेर राहून सरकार चालवता येत नाही. त्यामुळे पक्षाने जो निर्णय घेतला तो मी मान्य केला असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्यात आणि एकनाथ शिंदेंमध्ये चांगला संवाद

माझ्यामध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चांगला संवाद आहे. माईक खेचल्याची ती जी क्लिप चालली ती पूर्ण पाहिली तर लक्षात येईल की तो प्रश्न मला विचारला गेला होता. त्यामुळे तो मी तो माईक घेतला. त्यानंतर अर्धीच क्लिप माध्यमांनी चालवली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना एक कॅसेट चालवायला मिळाली. काही हरकत नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.