राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे या नेत्यांचा समावेश आहे. पहाटेचा शपथविधी जितका गाजला तितकाच हा दुपारचा शपथविधीही चर्चेत आहे. अशात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आता असं वक्तव्य केलं आहे आहे २०२४ पर्यंत मी जिवंत राहिलो तर भाजपाला मतदान करणार नाही.

नेमकं काय म्हटलं आहे प्रकाश महाजन यांनी

“सरस्वती विद्येची देवता आहे याबाबत छगन भुजबळांचं काय मत आहे? ज्याने ब्राह्मणांना यथेच्छ शिव्या दिल्या त्या अमोल मिटकरींचं हिंदुत्वाविषयी काय मत आहे? त्यांनी आजच म्हटल आहे की भाजपाचं हिंदुत्व बेगडी आहे. अजित पवार संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणार आहेत का? ” असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला आहे.

सगळे सत्तेसाठी एकत्र आले आहेत

सत्तेसाठी हे सगळे एकत्र आले आहेत. ३७० कलमाविषयी यांचं काय मत आहे? ट्रिपल तलाकबाबत हसन मुश्रीफ यांचं काय मत आहे? मोदींनी इंदूरच्या सभेत एक टोपी फेकली ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची या सगळ्यांच्या डोक्यावर फिट बसली त्यामुळे ते सत्तेत गेले. भाजपाचं इतकं अधःपतन झालं आहे ते या निमित्ताने पाहण्यास मिळालं.

भाजपाच्या हाती दोन शस्त्रं आहेत ईडी आणि सीबीआय. यांचा भ्रष्टाचार भाजपाला माहित आहे. हे काही देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले नाहीत. यांचा स्वार्थ आहे. स्वार्थासाठी जे रक्ताची नाती विसरले ते जनतेला कधीही विसरु शकतात. यांनी विचारलं का जनतेला मी जाऊ का भाजपासह. सत्तेसाठी एकत्र आले आहे. या सगळ्या गोष्टींना भाजपाही तेवढाच जबाबदार आहे असंही प्रकाश महाजन म्हणाले.

मी आता ठरवलं आहे २०१४ आणि २०१९ ला मी माननीय मोदींना मत दिलं होतं. मात्र २०२४ ला जर मी जिवंत राहिलो तर भाजपाला कधीच मत देणार नाही. ज्या लोकांच्या विरोधात आम्ही लढत आलो तेच लोक सत्तेत बसणार असतील तर त्याला काय अर्थ? मी उपाशी राहणं पसंत करेन, औषधं घेणं पसंत करेन पण असल्या लोकांच्या हातून सन्माननिधी स्वीकारणार नाही असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.