अखेर राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त हजारावर शिक्षकांना दोन वेतनवाढी मंजूर करण्याच्या न्यायालयीन आदेशाची शासनाने अंमलबजावणी केली आहे. २००५ ते २०१२ दरम्यानच्या १ हजार ५५ पुरस्कारप्राप्त शिक्षकांना हा लाभ मिळणार असून हा अपवाद असल्याचे शासनाने एका निर्णयातून स्पष्ट केले आहे. न्यायालयीन लढा व शेवटी न्यायालयीन अवमानाचा मुद्या उपस्थित केल्यावर शासनाला अखेर या निर्णयाची अंमलबजावणी करणे भाग पडले.

गेल्या ३० एप्रिल १९८४ च्या निर्णयान्वये राज्य किंवा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन अग्रिम वेतनवाढी लागू होत्या. मात्र, राज्यात सहावा वेतन आयोग लागू झाल्यावर अग्रिम वेतनवाढी लागू करण्याची तरतूद नव्हती, तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम वेतनवाढी देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रोख १ लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. वेतनवाढीऐवजी ही रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्याची भूमिका त्यामागे होती. दरम्यान, शिक्षक पुरस्कार जाहीर झाले, पण त्यात वेतनवाढ न देण्याची सुधारित बाब अंतर्भूत न झाल्याने शासनाने वेतनवाढीस मंजुरी दिली. या पाश्र्वभूमीवर २००५ ते २०१२ या काळातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढी न मिळाल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या. न्यायालयाने त्या एकत्रित करून निर्णय देतांना १६ डिसेंबर २०१४ ला या शिक्षकांना आगावू वेतनवाढीची रक्कम सहा महिन्यात देण्याचे निर्देश शासनास दिले.

मात्र, ठराविक कालावधीत त्याची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सामान्य प्रशासन विभागाने ठरलेल्या काळातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना अग्रिम वेतनवाढी देण्याबाबत १ फे ब्रुवारी २०१६ ला निर्णय घेतला, परंतु आर्थिक तरतुदीचे कारण देत व वेतनवाढी देण्याची तरतूद नसल्याचे नमूद करून न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने ती फे टाळली. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण, वित्त व सामान्य प्रशासन विभागाच्या संयुक्त बैठकीत वेतनवाढीला मंजुरी देण्यात आली. मात्र, ही वाढ पाचव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार दिल्याने व न्यायालयीन आदेश सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने असल्याने पूर्वीचा निर्णय १६ सप्टेंबर २०१६ च्या आदेशानुसार रद्द करण्यात आला. मात्र, केवळ ३२ शिक्षकांनाच लाभ मिळाला. त्याचा विचार करून आता दोन वेतनवाढीचा सुधारित निर्णय झाला आहे. सन २००५ ते २०१२ या कालावधीतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांबाबत हा नवा निर्णय आहे. या १ हजार ५५ शिक्षकांपैकी ३८ शिक्षकांना दोन अग्रिम वेतनवाढी मंजूर करण्यात आल्या. त्यांना वगळून अन्य २५५ शिक्षकांना पूर्वीच वेतनवाढी देण्यात आल्या. त्याला कायोत्तर मंजुरी देण्यात येत आहे. उर्वरित ७६२ शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार दोन अग्रिम वेतनवाढी देण्यास शासन मान्यता देण्यात येत असल्याचे या निर्णयातून स्पष्ट करण्यात आले आहे. वेतनवाढीचा हा खर्च २०१६-१७ च्या मंजूर तरतुदीतून करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निर्णयामुळे पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा अथक लढा अखेर यशस्वीपणे संपुष्टात आला. त्यांना वेतनवाढ की रोख ठराविक रक्कम यापुढे मिळणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती मिळाली.