अहिल्या नगर : केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण कार्यक्रमात पंचायत विकास निर्देशांक व राष्ट्रीय पंचायत पुरस्कार कार्यक्रमात ‘जिल्हास्तर जलसमृद्ध गाव’चा प्रथम पुरस्कार आदर्शगाव हिवरेबाजारला मिळाला.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी नगरमध्ये आयोजित कार्यशाळेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष डॉ. पोपटराव पवार, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रम पाचपुते, यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वीज मुळीक आदींच्या उपस्थित पुरस्कार वितरण करण्यात आले.
हिवरेबाजार गावाला पाण्याच्या ताळेबंदावर आधारित पीक पद्धतीचा अवलंब तसेच गुणवत्तापूर्ण जलसंधारण कामामुळे हा पुरस्कार मिळाला. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहन देणे, कार्यक्षमता वाढवणे आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून नवी ऊर्जा देणे हा उद्देश आहे. यामुळे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, असा अभियानाचा उद्देश आहे.
पुरस्कार स्वीकारताना हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे, सेवा संस्थेचे अध्यक्ष छबुराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, एस. टी. पादीर, मुंबादेवी दूध संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, सहदेव पवार, राजू पवार, श्रीपत फलके आदी उपस्थित होते.
अभियानातून पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास यांसारख्या क्षेत्रांत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. या निमित्ताने गावाचा विकास म्हणजेच जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याचा विकास म्हणजेच राज्याचा विकास ही संकल्पना अधिक बळकट होईल.
आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांच्या पुढाकारातून जलसंधारणाच्या विकासाचे विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. पावसाच्या पाण्याचा ताळेबंद करून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातून गावात समृद्धी निर्माण झाली. याशिवाय इतरही अनेक सामाजिक पुढाकाराचे विविध उपक्रम राबवले जातात. ग्रामपंचायत, सेवा संस्था यासह गाव पातळीवरील विविध निवडणुकाही बिनविरोध केल्या जातात. ग्रामपंचायतीला विविध पुरस्कारही मिळाले आहेत.