एक काळ असा होता की विदर्भाचा विकास झालेला नव्हता. मात्र आता तशी परिस्थिती नाही. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीयांनी प्रयत्न केले आहेत, यापुढेही केले पाहिजेत. आपण आत्तापेक्षा आणखी पुढे जाऊ असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. तसंच आपण जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा नागपूरविषयी आणि विदर्भाविषयी काय उत्तर दिलं होतं तो किस्साही नितीन गडकरींनी सांगितला. वाशिम येथील कार्यक्रमात नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच यावेळी आपण हल्ली कुणालाही फुकट मदत करत नाही लोकांना वाटतं याच्याकडे हरामाचा पैसा आहे असंही वक्तव्य नितीन गडकरींनी आपल्या भाषणात केलं आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?

मी ज्यावेळी आमदार नव्हतो नव्हतो तेव्हा आम्ही काही मित्र मिळून पीव्हीसी पाईपचं मशीन घ्यायला गेलो होतो. त्यावेळी आम्हाला विचारणा झाली की तुम्ही नागपूरहून म्हणजे विदर्भातून आलात का? मी म्हटलं हो आम्ही नागपूरहून आलो, ते विदर्भातच येतं. मग त्या व्यापाऱ्याने आम्हाला विचारलं विदर्भाचा विकास झाला आहे का? मी म्हटलं होतं नाही. मग ते मला म्हणाले नागपूरमध्ये लोकसंख्या किती आहे? मी त्यांना उत्तर दिलं २२ लाख. ते म्हणाले तिकडे उद्योग व्यवसाय आहेत का? मी म्हटलं जास्त नाहीत. मग त्यांनी मला विदर्भाची लोकसंख्या विचारली मी उत्तर दिलं पाच कोटी वगैरे असेल, तिथेही उद्योग व्यवसाय नाही. मग त्यांनी विचारलं इतके लोक काय करतात? मी त्यांना उत्तर दिलं होतं. गावांगावांमध्ये पान ठेले आहेत, तिथे ते लोक पानावर कथ्था चुना लावतात आणि बाकीचे लोक पान खातात. मी हे गंमतीने म्हटलं होतं पण दुर्दैवाने ते खरं होतं. मात्र आज विदर्भात ती स्थिती नाही. विदर्भाचं नाव जगात कशामुळे पोहचलं? तर १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणून पोहचलं. ही चांगली गोष्ट नाही हे आमच्यासाठी भूषणावह नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की हे चित्र बदलायचं ठरवलं तर नक्की हे चित्र बदलेल.

विदर्भाचं चित्र बदलण्याठी मी मंत्री झाल्याापसूनच प्रयत्नशील

मी स्वतः शेतकरी असल्याने विदर्भाचं चित्र बदलण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आपला शेतकरी अन्नदाता आहे तो उर्जादाता झाला पाहिजे या दृष्टीने मी काम केलं. येत्या काळात शेतकरी हा विमानाचा इंधन दाता होईल अशी स्थिती आहे. एक म्हण आहे की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येईल पण पाणी पाजता येणार नाही. त्यामुळे तसं काम केलं पाहिजे. हे कठीण आहे पण अशक्य नाही. मी नागपूरचा खासदार असलो तरीही दिल्लीत मी महाराष्ट्राचा अँबेसेडर आहे. विदर्भाच्या सर्वांगिण विकासाची जबाबदारी ज्या आमदार-खासदारांवर आहे त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे असंही नितीन गडकरी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी हल्ली जेव्हा मदत करतो तेव्हा ती कुठलीही गोष्ट फुकट देत नाही. १० रुपयांची वस्तू १ रुपयात देतो. कारण लोकांना वाटतं हा मंत्री आहे याच्याकडे हरामाचा पैसा असेल त्यातून हा देत असेल. मी १५ हजारांचं डिटिल कर्णयंत्र १५०० रुपयांमध्ये वाटलं, पण फुकट देत नाही त्यामागे तेच कारण आहे. आता मी एक लॅब उभी करतो आहे त्यातल्या टेस्टही माफक दरांमध्ये असणार आहे. रात्रंदिवस ते सुरु असणार आहे. कोव्हिडच्या काळात आपण १०० कोटींचं साहित्य विदर्भात वाटलं. तो काळ कठीण होता पण त्यालाही आपण सामोरे गेलो असंही नितीन गडकरी म्हणाले.