नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा येथे धार्मिक दंगल झाली होती. ते जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशभर जातीय दंगली होतील, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी येथे सांगितले. औरंगाबाद येथील आमखास मैदानावर मराठवाडय़ातील बसपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. राहुल गांधी यांचा युवराज असा उल्लेख करून त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. मात्र, काँग्रेसवरील टीकेची भाषा तिखट नव्हती.
गुजरात येथे २००२ मध्ये गोध्रा कांड झाले. ते न थांबविणारे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले तर जातीय दंगली होतील आणि देश बरबाद होईल, त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसने जाहीरनाम्यातील ५० टक्के आश्वासनेदेखील पूर्ण केली नाहीत. भाजपशासित राज्यातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे बसपा जाहीरनामाच प्रसिद्ध करत नाही. ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी थेट कृती कार्यक्रमच हाती घेतले जातात, असे मायावती यांनी सांगितले. सत्तेची चावी हातात घेतल्याशिवाय गरीब, शोषित जनतेला न्याय मिळणार नाही. त्यामुळे बसपाच्या मागे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही भांडवलदारांचे पक्ष आहे. बसपाचे काम कार्यकर्त्यांच्या पैशांवर सुरू असते. देशातील गरिबी आणि बेरोजगारीसाठी जबाबदार असणारा पक्ष काँग्रेस असल्याचे पक्षाचे मत असल्याचेही त्यांनी सांगितले. मोदी यांच्यावर मात्र त्यांनी जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If modi prime minister communal riot mayawati
First published on: 14-04-2014 at 01:54 IST