काँग्रेसच्या नकारात्मकतेवर रोहित पवार यांचे बोट
पंढरपूर : काँग्रेसचे नेते प्रियांका गांधी, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक सोडून न देता जोर लावून प्रचार केला असता, तर आघाडीच्या अजून १० ते १२ जागा वाढल्या असत्या. परंतु या जोरकस प्रचारात हा पक्ष कमी पडल्याचे मत राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी येथे बोलताना व्यक्त केले. विजयानंतर पवार यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
पवार म्हणाले, की आघाडीला मिळालेले यश हे केवळ शरद पवारांच्या धडाकेबाज प्रचाराच्या जोरावर मिळालेले आहे. या प्रचाराचा फायदा काँग्रेसला झाल्याने त्यांच्या एवढय़ा जागा निवडून आल्या आहेत. या जोडीने काँग्रेसच्या प्रियांका, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येत ही निवडणूक लढवण्यासाठी म्हणून प्रचार केला असता, तर अजून फरक पडला असता. आघाडीच्या अजून १०-१२ जागा वाढल्या असत्या. पण हा सर्वस्वी त्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे, अशी जोडही पवार यांनी दिली.
सातारा पोटनिवडणुकीतील निकालाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, की उदयनराजे यांना जनतेचा पहिल्यापासूनच विरोध होता. पण ते राष्ट्रवादीत असल्याने तो त्यांना कधी जाणवला नाही. उदयनराजे यांना मिळणारी मते ही त्यांना नसून पक्षाला मिळणारी मते होती. ते वेगळ्या पक्षातून लढल्याने आता त्यांना हा फरक समजला असेल अशी टीका रोहित पवार यांनी केली.
अहिल्यादेवींच्या जन्मस्थळास भेट
कर्जत : नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी विजयानंतर थेट चोंडी येथे जाऊ न अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या घरी जाऊ न त्यांच्या आई आणि वडिलांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या उपस्थित होत्या. रोहित पवार हे राम शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास गेले असता राम शिंदे यांनीदेखील त्यांचा फेटा बांधून सत्कार केला. दरम्यान, निवडणुकीदरम्यान परस्परांवर टोकाची टीका करणाऱ्या नेत्यांनी निवडणुकीनंतर एकमेकांप्रती दाखविलेल्या आदराबद्दल समाज माध्यमांतून कौतुक होत आहे. सर्व राजकारण्यांनी पवार आणि शिंदे यांच्याप्रमाणे आचरण करावे, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले.