लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कमीत कमी एक तरी जागा द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सोमवारी अमित शाह आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा केली आहे. लोकसभावेळी ४८ जागांपैकी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप करताना मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचा विचार न केल्यामुळे रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘जर आमच्या पक्षाला एकही जागा न दिल्यास शिवसेना – भाजपाला महाराष्ट्रातील दलित मताचा फटका बसेल. राज्यात आणि केंद्रात एनडीएला पुन्हा सत्तेत यायचे असल्यास आरपीआयची मदत लागेल. त्यामुळे आमच्या पक्षाला लोकसभामध्ये एक तरी जागा द्या. यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेईल, असे आठवले म्हणाले.’
शिवसेना-भाजपा आणि आरपीआय (ए) यांनी मिळून एकत्रित निवडणूक लढवल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या ४३-४४ जागा जिंकता येतील, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. मी फक्त एका जागेची मागणी केली होती. मात्र, युतीची जागावाटर करताना आरपीआयचा विचार न केल्यामुळे महाराष्ट्रातील दलीत समाज नाराज असल्याचे आठवले म्हणाले.
R Athawale: If we don’t get even 1 seat, votes of Dalits in Maharashtra for BJP-Shiv Sena will be affected. If they want to come back to power in state&NDA wants to come back at centre RPI(A) will contribute, so we should be given a seat. We’ll meet CM & Uddhav Thackeray. (18.02) https://t.co/GNL4HzfSq8
— ANI (@ANI) February 18, 2019
आंबेडकरी जनता माझ्यासोबतच आहे असा दावा करून, आगामी निवडणूक दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपण लढणार आहोत असा निर्धार रामदास आठवले यांनी केला आहे. चार फेब्रुवारी रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी आपला मानस बोलून दाखवला होता. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ शिवसेनेचा असल्यामुळे आरपीआयबाबत शिवसेना-भाजपा काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.