दारू तस्कर अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी अनेक अनोख्या शक्कल लढवत असतात. कधी कचऱ्याच्या आडून, तर कधी चारा टाकून दारू तस्करी केली जाते. मात्र, गोव्यावरून गुजरातला दारू वाहतूक करण्यासाठी दारू तस्करांनी चक्क सॅनिटरी पॅडच्या गोण्यांचा वापर केला आहे. सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून दारू तस्करी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र धुळे पोलिसांनी या काळ्या कृत्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन दारू तस्करांना ताब्यात घेतले आहे. गोव्यातून धुळेमार्गे गुजरातला आयशर ट्रकमधून लाखो रुपयांचा बियर व दारूसाठा नेला जात होता.

गोव्यातून धुळेमार्गे गुजरातला मोठा मद्यसाठा नेला जात असल्याची खात्रीशीर माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. ही गोपनीय माहिती मिळताच मुंबई-आग्रा महामार्गावरील आवधान शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत संशयित आयशर ट्रक थांबवला. चालकाकडे गाडीतील मालाबबत विचारपूस केली. यावेळी ट्रकमध्ये सॅनिटरी पॅडने भरलेल्या गोण्या असल्याचे चालक व वाहकाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्यावर त्यांनी आयशर ट्रकमधील मालाची तपासणी केली. या तपासात पोलिसांना सॅनिटरी पॅडच्या गोण्यांखाली चक्क मोठ्या प्रमाणात बियर व विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी आयशर ट्रकमधून ७ लाख ८१ हजार ८०० रुपये किमतीचे विदेशी दारूचे तब्बल २०५ खोके, ५२ हजार ८०० रुपये किमतीचे बीयरचे २० खोके, १२ हजार रुपये किमतीच्या सॅनिटरी पॅडच्या १०० गोण्या व १० लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक, असा एकूण १८ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.