नवी मुंबईतील कामोठेमध्ये सिडकोने अनधिकृत मार्केट जमीनदोस्त केले आहे. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. सिडकोकडून जमीनदोस्त करण्यात आलेले मार्केट साधारणत: ५ ते ७ वर्षे जुने होते. दोन एकरांवर पसरलेले हे मार्केट आज सकाळी तोडण्यात आले. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिकांचे स्टॉल्स होते.

कामोठेमधील परिसरातील खुल्या जागा मोकळ्या करुन देण्याची मागणी पनवेल महापालिकेने सिडकोकडे केली होती. त्यामुळेच सिडकोने आज सकाळी सेक्टर ३४ मधील मार्केट जमीनदोस्त केले. कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली. या मार्केटमध्ये भाजीपाल्यासह कपड्यांची दुकाने होती. सेक्टर ३४ नंतर सेक्टर ५ मधील मार्केटदेखील तोडण्यात येणार आहे. हेदेखील मार्केट अनधिकृत आहे. कामोठेमध्ये अशी ४-५ मार्केट आहेत.

कामोठेच्या ३४ सेक्टरमधील मार्केट तोडताना सिडकोला स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी स्थानिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रकार केला. विशेष म्हणजे या कारवाईबद्दल सिडकोने अतिशय गुप्तता पाळली होती. या कारवाईसाठी बंदोबस्त आवश्यक असल्याची माहिती आज सकाळीच पोलिसांनी देण्यात आली. यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात मार्केट जमीनदोस्त करण्यात आले.