सांगली: वाळवा तालुका काँग्रेसच्या इमारतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या २४ वर्षापासून बेकायदा कब्जा केला आहे. नैतिकता असेल तर इस्लामपुरातील साडेतीन हजार चौरस फूटाची इमारत राष्ट्रवादीने परत करावी असे आवाहन काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसच्या इमारतीवर कब्जा केला आहे.
श्री. पाटील यांनी सांगितले, इस्लामपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस वापरत असलेली इमारत अखिल भारतीय काँग्रेसची आहे. वाळवा तालुका काँग्रेस समितीचे सचिव बाबूराव कृष्णाजी पाटील यांनी सरकारी जागेची मागणी केली होती. या मागणीनुसार मिळालेल्या जागेसाठी शासकीय दराने एक हजार ६६० रूपये जमा केले होते. तत्कालीन तालुकाध्यक्ष मोहनराव पाटील यांनी १९५९ मध्ये ही जागा ताब्यात घेतली. साडेतीन हजार चौरस फूट ही जागा आहे. आजही या जागेवर कागदोपत्री प्रेसिडेंट वाळवा तालुका काँग्रेस असे नाव आहे.
यामुळे नैतिकता असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेससाठी परत द्यावी असे आवाहन करून श्री. पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असून राज्यातील मातब्बर नेते आहेत. त्यांनी पक्ष कार्यालयासाठी कोठेही जागा मिळू शकते, ते घेऊ शकतात. यावेळी शाकीर तांबोळी, युवक सरचिटणीस विजय पवार, अर्जुन खरात, राजू वलांडकर आदी उपस्थित होते.