येत्या ४८ तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD अर्थात भारतीय हवामान खात्याने आपल्या पत्रकात या संदर्भातली माहिती दिली आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगला राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतल्या महत्त्वाच्या काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये मध्यम आणि हलक्या सरी बरसतील.

३० जूनच्या सकाळपासूनच वातावरण ढगाळ असेल, सकाळपासूनच पाऊस सुरू होईल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. सातारा, कोल्हापूर यामध्ये संमिश्र पाऊस पडेल. मुंबईत १ जून ते २९ जून या कालावधीत ५४१ मिमी पाऊस पडला. हे प्रमाण १२ मिमीने वाढले आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि पणजीमध्ये पाऊस कमी प्रमाणात बरसला आहे. तर नाशिक, हिंगोली, नागपुरात चांगला पाऊस झाला असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे. कोयना धरण परिसरात चांगला पाऊस झाला आहे. तिथे असलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पाला या पावसामुळे चांगला हातभार लागणार आहे. कोयना धरण भागात गेल्या दोन दिवसात २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.