बदलत्या वातावरणात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चे महत्त्व सर्वानी ओळखले पाहिजे. पाण्याची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करणे, ही काळाची गरज आहे. या वर्षी मराठवाडय़ात कमी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पाण्याचे महत्त्व अधिकच जाणवणार आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
संस्कार प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या स्थानिक शाखेच्यावतीने रविवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अॅड. मधुकर गोसावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. संस्कार प्रबोधिनीचे स्थानिक शालेय समिती अध्यक्ष विलास नाईक, त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक डॉ. विजयकुमार आराध्ये यांनी या वेळी बागडे यांचा सत्कार केला. या वेळी बागडे म्हणाले की, १९८० या सुमारास आपण आणि स्व. प्रमोद महाजन यांनी निवडणुकीत एकत्रित काम केले. त्या वेळी आमच्या पक्षाचा पराभव झाला. परंतु तेथून पुढे खऱ्या अर्थाने आपण राजकारणाकडे वळलो. त्यामुळे आपल्या राजकीय वाटचालीत जालना शहराचे मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे काम करतील. विधानसभा अध्यक्ष म्हणून सभागृह सुरळीत कसे चालवायचे, ही जबाबदारी माझ्यावर आहे. विधानसभा हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे व्यासपीठ आहे. नवनिर्वाचित आमदार जनतेचे प्रश्न तळमळीने मांडतील, अशी आपणास अपेक्षा आहे. विधानसभा चालविण्यासाठी नियम आहेत आणि त्या नियमांच्या अधीन राहूनच कामकाज चालवावे लागते. मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे उपकेंद्र जालना शहरात व्हावे यासाठी आपल्याकडे मागणी करण्यात आली असून त्यासाठी आपण सकारात्मक आहोत, असे ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, बागडे यांना विधानसभा अध्यक्षपदासारखे अत्यंत महत्त्वाचे आणि सन्मानाचे पद मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सभागृहाचे काम सुरळीत चालेल, असा विश्वास आहे. दानवे यांनी या वेळी विधानसभेतील आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. अॅड. गोसावी यांनी अध्यक्षीय समारोप केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बबन लोणीकर, दिलीप तौर, अरविंद चव्हाण, विलास खरात आदींची उपस्थिती यावेळी होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2014 रोजी प्रकाशित
‘पाणी बचतीचे महत्त्व ओळखण्याची गरज’
बदलत्या वातावरणात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चे महत्त्व सर्वानी ओळखले पाहिजे. पाण्याची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करणे, ही काळाची गरज आहे.

First published on: 01-12-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important of water saving