भांडणे सोडवण्यास गेलेल्या मध्यस्थाचाच खून करणा-या दोघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याच खटल्यातील आणखी एका महिला आरोपीला ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली. नगर शहरात सावेडी भागात ही घटना घडली होती.
पोपटराव भाऊसाहेब दळवी (राहणार शीलाविहार, नगर) यांच्या खुनाबद्दल जिल्हा तदर्थ न्यायाधीश ए. एन. मोरे यांनी सागर विजय काळे (वय २०), विशाल अशोक काळे (वय २४) आणि सीमरन बशीर शेख (वय २३, सर्व राहणार नगर) यांना दोषी ठरवले. यातील सागर काळे व विशाल काळे या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर शेख हिला ३ महिने कारावासाची शिक्षा देण्यात आली. या खटल्या सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा अतिरिक्त सरकारी वकील रमेश जगताप यांनी काम पाहिले.
याबाबतची माहिती अशी की, वरील तिघे आरोपी दि. ६ मे ११ ला शीलाविहार येथे परस्परांमध्ये भांडत होते. सायंकाळी फिरायला जाताना ताराचंद दळवी यांनी हे पाहिले. या तिघांची भांडणे सोडवून त्यांना समजवण्याचा प्रयत्न ते करीत असताना आरोपींनी त्यांनाच दमदाटी करून मारहाण सुरू केली. दळवी हे जवळच असलेल्या त्यांच्या भावाच्या घरी पळू लागले. आरोपी त्यांचा पाठलाग करीत असतानाच दळवी यांचे भाऊ पोपटराव दळवी यांनी ते पाहिले. तेही या आरोपींना समजावण्याचा प्रयत्न करण्यासाठी भावाच्या मदतीला धावून गेले असता आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. उपचार सुरू असतानाच त्यांचे रुग्णालयात निधन झाले.
पोपटराव दळवी यांचे चिरंजीव अभिजित यांनी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या खटल्यात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले, ते सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imprisonment 2 accused in murder case
First published on: 24-07-2014 at 03:24 IST