दोन वर्षांपासून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम रखडले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. या भागातील नागरिकांना माती मिश्रित गढूळ पाणी प्यावे लागते आहे. सरकारने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू ठेवला आहे.  उमटे धरणावर गेल्या दोन वर्षांपासून जल शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आह. मात्र ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे   आजही हे काम अर्धवटच  आहे.

अलिबाग तालुक्यातील ६२ गावे वाडय़ांना उमटे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. १९८० साली हे धरण बांधण्यात आले. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील पाणी प्रश्न बऱ्याच अंशी सुटला, मात्र गेल्या ३७वर्षांत या धरणातील गाळ काढलेला नसल्याने एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी लोकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. उमटे धरणात अनेक गुरे ढोरे मरून पडतात व ती तशीच धरणात अडकून राहतात. त्यामुळे नागरिकांनाही अशुद्ध पाणीच प्यावे लागत आहे.

धरणातील गाळ काढण्यासाठी धरणाच्या खालच्या बाजूने जनवाहिनी टाकलेली नसल्याने गाळ उपसण्यास अडथळा येत असल्याचे  जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता माळी यांनी सांगितले. त्याचबरोबर उमटे धरणातील गाळ उपसण्यासाठी  खालपर्यत पाईपलाईन टाकून  नव्याने धरणाचे काम करावे लागेल व त्यासाठी साधारण ३ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. यासाठीचा प्रस्ताव नाशिक येथे जलसंधारण विभागाकडे पाठविला असल्याची माहिती त्यांनी दिली .

उमटे धरणावर सुरू असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे ५ कोटींचे काम ठेकेदार अर्धवट सोडून गेला असून आजही लोकांना अशुद्ध पाणी मिळत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर येथील ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. मात्र १९८० पासून उमटे धरणातून पाणी पुरवठा लोकांना होत असून आजही पाणी शुद्धीकरण प्रकल्प अपुरा असल्याने नागरिकांना अशुद्ध पाणीच प्यावे लागत आहे. याबाबत जिल्हा परिषदेने लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लक्ष देऊन हा जलशुद्धी प्रकल्प लवकर पूर्ण करण्याकडे  लक्ष देणे गरजेचे आहे.

दोन वष्रे जलशुद्धीकरण प्रकल्प रखडला असून यावर कोटय़वधी रुपयांचा चुराडा झाला आहे. मात्र तरीही हा प्रकल्प युद्ध पातळीवर सुरू करून काम पूर्ण करण्याची गरज असताना अजूनही जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे समोर येत आहे. धरणातील गाळ उपसाला तर पावसाळ्यापर्यंत नागरिकांना योग्य पद्धतीने पाणी पुरवठा होऊ शकतो. यावर आता पाणी पुरवठा विभागाने जातीने लक्ष देऊन लोकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवायला पाहिजे.

उमटे धरणातील गाळ न उपसल्याने पाणीसाठा कमी झाला आहे त्यामुळे या धरणातून मिळणारे पाणी नागरिकांना एक दिवसाआड मिळत आहे. त्यामुळे ऐन लग्न सराईत नागरिकांची पाण्यासाठी गरसोय होत आहे. त्यातच अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने आजारांनी डोकं वर काढलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impure mud water supply from umte dam
First published on: 17-05-2017 at 02:17 IST