राहाता: काकडी शिवारात चोरट्यांनी केलेल्या बाप-लेकाच्या हत्याकांड घटनेवेळी गंभीर जखमी झालेल्या साखरबाई साहेबराव भोसले या महिलेने आठवडाभर दिलेल्या मृत्यूच्या झुंजीनंतर, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी मृत्यू झाला. चोरीच्या उद्देशाने झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण कुटुंब संपवले. वडील व मुलाचा दशक्रिया विधी होण्यापूर्वीच आईचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोघा चोरट्यांनी ज्या ठिकाणी मुरघास बनवण्याचे काम केले, त्याच कुटुंबाच्या जीवावर चोरटे उठले. चोरलेल्या मोबाईलमुळे बारा तासांत आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींनी चोरीच्या उद्देशाने कृत्य केल्याची कबुली दिली. भोसलेंच्या घरातून चोरलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले.

दि. ५ एप्रिलच्या घटनेत साहेबराव पोपट भोसले, मुलगा कृष्णा साहेबराव भोसले दोघांचा चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला तर गंभीर जखमी साखरबाई भोसले यांचा उपचार चालू असताना आज पहाटे मृत्यू झाला. संदीप दहाबाड (१८) व जगन काशिनाथ किरकिरे (२५) या दोन तरुणांना मक्याची कुट्टी करून जनावरांचा मुरघास बनवण्यासाठी भोसले यांच्या नातेवाईकांनी काकडी शिवारात आणले. भोसले यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने त्यांचा मुरघास या दोघांनी बनवून दिला. ओळख वाढल्याने भोसले यांच्या घरी त्यांचे जाणे येणे सुरू होते. या निमित्ताने दोघे घराची झाडाझडती घेत. जाताना मोठा माल घेवून जावू, असे दोघे स्वप्न रंगवत. मुरघासचे काम संपल्याने घरी परतायचे म्हणून त्यांनी ५ एप्रीलची रात्र निवडली.

रात्री दबा धरून बसलेल्या या दोघांनी पहाटे भोसले यांचा दरवाजा ठोठावला. ओळखीच्या कामगारांचा आवाज आहे, म्हणून दरवाजा उघडताच दोघांनी टणक हत्यार व पावड्याने मारहाण केली. जखमी झालेले कृष्णा व साहेबराव निपचित रक्ताच्या थारोळ्यात पडले. पत्नी साखरबाई यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला, त्याही गंभीर जखमी झाल्या. हे दोघे दरोडेखोर मोटारसायकल, मोबाईल व सोने घेवून पसार झाले. पोलिसांनी दोघांना पळसे टोलनाक्याजवळ (सिन्नर) जेरबंद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपींकडून किती किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले, याबाबत तपासी अधिकारी तथा शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने यांच्याशी संपर्क साधला असता, दोषारोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांचा कालावधी आहे. इतर तपास कामी असल्याने आरोपींकडील सोन्याची खातरजमा व मोजदाद केली नसल्याचे सांगितले. किती मुद्देमाल हस्तगत केला याचा तपशील नऊ दिवसांत पोलिसांनी जाहीर न केल्याने नागरिक संशय व्यक्त करत आहेत.