अहिल्यानगर:शहराच्या बोल्हेगाव उपनगरातील रहिवासी नीलेश दादासाहेब दिवे (रा. गांधीनगर) यांनी, सावेडी उपनगरातील मॉलमधून खरेदी केलेल्या मॅगीच्या पाकिटामध्ये मृत पालीचे पिल्लू आढळले. यासंदर्भात त्यांनी उत्पादक कंपनी व मॉलवर कारवाई करावी, अशा मागणीचा तक्रार अर्ज अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आज, बुधवारी दाखल केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले.
अधिक माहिती देताना नीलेश दिवे यांनी सांगितले की, सावेडी उपनगरातील ‘डी मार्ट’ या मॉलमधून २ जुलैला पाचशे ग्रॅम वजनाची दोन मॅगीची पाकिटे खरेदी केली. दहा दिवसांपूर्वी त्यातील एका पाकिटाचा वापर केला. त्यानंतर सोमवारी (दि. २८) दुसरे पाकीट फोडले असता त्यातील मॅगीमध्ये पालीचे मृत पिल्लू आढळून आले.
नीलेश दिवे यांनी सांगितले की, आपण संबंधित नेस्ले कंपनी व डी मार्ट या दोघांनाही ई-मेल पाठवून तक्रार नोंदवली आहे तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात तक्रार दिली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सांगितले की नेस्ले कंपनी व डी मार्ट मॉल हे दोघेही केंद्रीय ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑफ इंडिया’ या केंद्रीय कायद्यान्वये परवानाधारक असल्याने केंद्रीय विभागास माहिती कळवली जाणार आहे तसेच येथील वितरकांना या बॅचचे उत्पादन विक्री करू नये असे कळवले जाईल.
तक्रारीचा ई-मेल नेस्ले उत्पादक कंपनी व डी मार्ट मॉलला पाठवल्यानंतर दोघांनीही पैसे परत करू, असे सांगितले. परंतु आपल्याला पैसे नको आहेत, कारण मॅगी लहान मुले खातात, त्यामुळे संबंधितावर कारवाई व्हावी, अशी आपली मागणी आहे. – नीलेश दिवे, तक्रारदार
उत्पादक नेस्ले कंपनी व विक्री करणारे डी मार्ट मॉल हे दोन्हीही केंद्रीय परवाना प्राधिकरणकडून परवाना मिळवलेले आहेत. त्यामुळे नीलेश दिवे यांची तक्रार संबंधित विभागाकडे पाठवली जाईल. -राजेश बडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अहिल्यानगर