बीड – दसऱ्याच्या अनुषंगाने कपडे धुण्यासाठी आईसोबत खदाणीवर गेलेले बहीण भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना केज ( जि. बीड ) येथे शनिवारी सायंकाळी घडली. एकाच वेळी बहीण भावासह तिघांचा मृत्यू झाल्याने ऐन घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बीड जिल्ह्यातील केज शहरातील गणेश नगर भागात शेजारी राहात असलेली दोन कुटुंब शनिवार दि. १४ ऑक्टोबर रोजी केज-बीड रस्त्यावरील खदानीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास वैष्णवी गजानन वाघमारे ( वय १२ वर्ष ) आणि सोमेश्वर गजानन वाघमारे ( वय १५ वर्ष ) हे पाण्यात बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी त्यांची आई आशा गजानन वाघमारे यांनी आक्रोश केला. मुले डोळ्यादेखत बुडत असल्याचे पाहून त्या स्वतः पाण्यात उतरल्या. त्यांचा आरडा ओरडा ऐकून शेजारी असलेला अविनाश संतोष घोडके ( वय १८ वर्ष ) याने पाण्यात उडी घेतली.  आशा गजानन वाघमारे यांना वाचविण्यात त्याला यश आले मात्र सोमवश्वर व वैष्णवी या बहीण भावाला वाचवीत असताना खदानीतील पाण्यात बुडून अविनाश घोडके ( वय १८ ) याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत वैष्णवी व सोमेश्वर या दोन सख्ख्या बहीण भावा बरोबरच त्यांना वाचवायला गेलेल्या अविनाश घोडके याचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.  त्यांनी लोकांच्या मदतीने मृतदेह  बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवले.