सावंतवाडी: भाजपच्याच बांदा या बालेकिल्ल्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात येत आहे. यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. एकेकाळ पासून बांदा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

बांदा शहरातून जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांद्याच्या विशेष ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शवण्यात आला. बाधित शेतकरी भूमिहीन आणि अल्पभूधारक होणार असल्याने तसेच बांदा बाजारपेठ विस्थापित होणार असल्याने ग्रामस्थांनी एकमुखाने या महामार्गाविरुद्ध ठराव पारित केला. या विरोधात प्रशासनाशी लढण्यासाठी ‘महामार्ग विरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली असून, भाजपच्या सरपंच प्रियांका नाईक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत, जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, शामसुंदर मांजरेकर, साई काणेकर, रत्नाकर आगलावे, अनुजा वराडकर, दीपलक्ष्मी सावंत, शिल्पा परब, देवल येडवे, रिया येडवे, ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीला मोर्ये, तलाठी फिरोज खान, वनपाल प्रमोद सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला उपसरपंच धारगळकर यांनी शहरातील ५८ सर्वे नंबर वाचून दाखवले, जे या महामार्गामुळे बाधित होणार आहेत. गुरुनाथ सावंत यांनी बांदा बाजारपेठ पूर्णपणे विस्थापित होण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मागणी केली की, हा महामार्ग शहरातून न नेता पर्यायी मार्गाने न्यावा आणि स्थानिकांना विश्वासात घ्यावे. महामार्गाला विरोध नसून, स्थानिक शेतकरी विस्थापित झाल्यास तीव्र विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर टाकलेल्या गुगल मॅपिंगनुसार, पानवळ येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाकडून या महामार्गाची सुरुवात होणार आहे. बळवंतनगरमार्गे समोरून हा मार्ग सीमा तपासणी नाक्याकडे जाणार आहे. या ठिकाणी सीमा तपासणी नाक्यासाठी यापूर्वीच ३२ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. तसेच तिलारी उपकालवा व मुंबई-गोवा चौपदरी महामार्गासाठीही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्याने, आता पुन्हा जमिनी घेतल्यास स्थानिक शेतकरी पूर्णपणे विस्थापित होतील, असे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक शेतकरी भूमिहीन आणि अल्पभूधारक होणार असल्याने या महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.

सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महामार्ग विरोधी कृती समिती गठित करण्यात आली. या समितीत उपसरपंच आबा धारगळकर यांच्यासह सर्व १५ ग्रामपंचायत सदस्य आणि बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिल्याच्या मुद्द्यावरून ग्रामसभेत गजानन गायतोंडे यांनी प्रश्न उपस्थित केला, ज्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. यावर भाऊ वाळके, ज्ञानेश्वर सावंत आणि गुरुनाथ सावंत यांनी सांगितले की, ते गावासोबत आणि बाधित शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे राहतील. ही कृती समिती शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सह्यांची मोहीम राबवून स्थानिकांचा विरोध दर्शवणारे निवेदन देणार आहे आणि या लढ्याला अधिक तीव्र करणार आहे, असे या बैठकीत ठरविण्यात आले.