scorecardresearch

Premium

चांगभलं : पडकी इमारत बनली विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ, ४० शासकीय अधिकारी घडवले

काही महिन्यांच्या परिश्रमानंतर भरनोलीतील ती एके काळची पडकी इमारत आज टुमदार इमारतीच्या स्वरूपात सज्ज झाली. या सुसज्ज इमारतीला पोलीस अधिकाऱ्यांनी दीपस्तंभ नाव दिले.

Abandoned building was helps students for further studies, 40 students become government officers
चांगभलं : पडकी इमारत बनली विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ, ४० शासकीय अधिकारी घडवले

अनिल कांबळे

नागपूर : नक्षलवाद्यांच्या कारवायांनी ग्रस्त असलेला गोंदिया जिल्हा… त्यात भरनोली नावाच्या छोट्याशा खेड्यात १९६७ सालची पडकी इमारत… या इमारतीआडून नक्षली हल्ला करतील असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संशय… त्यामुळे ती पडकी इमारत उद्ध्वस्त करण्याचे वरिष्ठांचे आदेश… मात्र, तत्कालीन पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी वरिष्ठांशी चर्चा केली… इमारत पाडण्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका म्हणून वापर करण्याची परवानगी घेतली… तत्कालीन पडक्या इमारतीचा पोलीस अधिकाऱ्यांनी चेहरामोहरा बदलला… त्या इमारतीला दीपस्तंभ अभ्यासिका नाव दिले… आज त्या दीपस्तंभातून एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क ४० शासकीय अधिकारी निर्माण झाले. ही किमया एका पोलीस अधिकाऱ्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून साकारली, हे विशेष….

Anil-deshmukh
कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या, अनिल देशमुख म्हणाले ‘जातनिहाय सर्वेक्षण…’
surprise inspection
पुणे : ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षाची आता होणार अचानक तपासणी; पोलीस आयुक्तांचे आदेश
Tata Consultancy Services (TCS)
TCS मध्ये वर्क फ्रॉम होम संपुष्टात? १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ५ दिवस कार्यालयात जावे लागणार
ganesh immersion procession concludes after 13 hours in nashik
आवाजाच्या भिंतींचा दणदणाट; राजकीय नेत्यांच्या मंडळांचा पुढाकार, १३ तासानंतर विसर्जन मिरवणुकीचा समारोप

२००३ साली गोंदिया जिल्ह्यातील राजोली गावामध्ये सशस्त्र दुरर्क्षेत्रवर (एओपी) नक्षली हल्ला झाला होता. जाळपोळ झाली होती. म्हणूनच तर ही एओपी राजोली गावातून भरनोली गावाजवळ वसवण्यात आली होती. या एओपीच्या उजव्या बाजूला काही अंतरावर १९६७ साली बांधण्यात आलेली इमारत मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती. जुनी इमारत निरुपयोगी, ढासळलेली होती. मात्र, इमारतीच्या भिंती किल्ल्यासारख्या मजबूत होत्या. तत्कालीन पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांची नजर त्या इमारतीवर गेली. त्यांनी इमारतीचा उपयोग करायचे ठरवले. बसवराज चिट्टे हे तेथील प्रभारी अधिकारी होते. संवेदनशील फौजदाराने या इमारतीचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्यावेळी स्वप्निल मासलकर, रोहित चौधरी, रमेश हत्तीगोटे एकदम उत्साही अधिकारी साथीला होते. कायापालट काय असतो? याचे शोधूनही न सापडणारे असे हे उदाहरण म्हणजे ती सुसज्ज झालेली इमारत होय. त्या अधिकाऱ्यांना इमारतीच्या सुसज्जतेसाठी कधी खूप परिश्रम घ्यावे लागले. शेवटी काही महिन्यांच्या परिश्रमानंतर भरनोलीतील ती एके काळची पडकी इमारत आज टुमदार इमारतीच्या स्वरूपात सज्ज झाली.

या सुसज्ज इमारतीला पोलीस अधिकाऱ्यांनी दीपस्तंभ नाव दिले. दीपस्तंभ अभ्यासिका नावाने स्पर्धा परीक्षा केंद्र तयार करून तेथे खेड्यापाड्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते उपलब्ध करून दिले. काही महिन्यांतच दीपस्तंभमधील तीन मुले पहिल्याच प्रयत्नात पीएसआय-एसटीआयची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले. पोलीस अधिकाऱ्यांसाठी आनंद आणि अभिमानाचा क्षण होता. ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे भरनोलीच्या आजूबाजूच्या गावातील १०० ते १५० आदिवासी मुले येथे येऊन घराघरात राहू लागली.

जिल्हाधिकारी आले धावून

गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दीपस्तंभ अभ्यासिकेला भेट दिली. अभ्यासात मग्न असलेल्या मुलांना बघून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी ५ लाखांची पुस्तके मंजूर केली. तेथून प्रेरणा घेत अन्य सहा ठिकाणी एओपीजवळ अभ्यासिका सुरू करण्यात आल्या. आता अभ्यासिकेत ५५० पेक्षा जास्त आदिवासी मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येत होती. याची दखल खासदारांनीसुद्धा घेतली आणि त्यांनी या इमारतीच्या बाजूने निवासासाठी आणखी एक इमारत बांधून दिली.

संदीप ताराम : विद्यार्थी ते पोलीस अधिकार

दीपस्तंभ अभ्यासिकेत अनेक पोलीस अधिकारी वेळ काढून मार्गदर्शन करायचे. त्यावेळी विद्यार्थी असलेला युवक संदीप ताराम मन लावून अभ्यास करायचा. स्पर्धा परीक्षेतून त्याची पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण. संदीपने नोकरी करतानाच दीपस्तंभसाठी काम करणे सोडले नाही. तसेच पवनी-लाखणीतही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असेच कार्य सुरू ठेवले. दीपस्तंभ अभ्यासिका आदिवासी तरुणाचा उद्धार करीत अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे पुण्यस्थळ बनले. गजानन राजमाने यांनी एओपीतील सहकारी अधिकारी व अंमलदार यांनी वर्गणी करून तेथील मुलांच्या गरजा निःस्वार्थपणे पूर्ण केल्या आहेत.

अभिमानाने ऊर भरून येतो

ज्या गावांमध्ये अजूनही वीज नाही, कुडाची घरे आहेत. पुस्तकाला पैसे नाहीत. पोठभर अन्न मिळण्याची शाश्वती नाही, औषधी काय असतात माहीत नाही. नक्षल्यांचा पाश नेहमी आवळलेला, जीवन-मरणाच्या अगदी सीमारेषेवर असलेले जीवन. पोलिसांशी संबंध ठेवले म्हणून मरणाची भीती कायम, तरीही जिद्दीने अभ्यास करणाऱ्या या मुलांच्या जिद्दीला सलाम. आत्महत्या नाही तर आत्मसन्मान वाढवणारी ही यांची कृती आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेच. पण एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अजून जास्त प्रेरणादायी. मुलांच्या डोळ्यात आकाशाला शिवल्याची चमक असते. ही मुले प्रतिकूल परस्थितीतही असंख्य संकटांना मागे सारून धीराने यशस्वी होत आहेत. ‘ज्युनियर’ असले तरी माझ्या साथीने उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना सलाम करावा वाटतो. त्यांनी, शक्य नसणारी, परंतु आपल्या अविरत कष्टातून ‘फौजदार तयार करणारी फॅक्टरी’, ही एमपीएससीचे माहेरघर असलेल्या पुण्यापासून हजार किलोमीटर अंतरावरील अतिनक्षल दुर्गम भागात सुरू केली. – गजानन राजमाने (पोलीस उपायुक्त, नागपूर पोलीस)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In gondia abandoned building was helps students for further studies 40 students become government officers asj

First published on: 06-08-2022 at 11:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×