जालना : मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडल्यामुळे जालना शहरवासीय त्रस्त झाले आहेत. अनेकांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले असून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. गेल्या वर्षभरात ६५० जणांना कुत्रे चावल्याच्या नोंदी शासन दरबारी आहेत.

कांही दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे एक स्वच्छता निरीक्षकच मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडले होते. रेल्वे स्थानक ते उड्डाण पूल दरम्यानच्या रस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात हे स्वच्छता निरीक्षक खाली पडले. आसपासचे नागरिक आणि त्यावेळी त्या भागात असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर या स्वच्छता निरीक्षकाच्या मदतीला धावून आले.

काही दिवसांपूर्वी शहरातील गांधीनगर भागातील चार-पाच वर्षाच्या बालकाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्…

छत्रपती संभाजीन‌गर येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सुदैवाने या बालकाचे प्राण वाचले. गेल्या कांही महिन्यांत जालना शहरवासीयाना भटक्या कुत्र्यांची दहशत बसली आहे. महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी कंत्राट दिलेले आहे. ते काम सुरु असल्याचे महपालिकेच्यावतीने सांगण्यात आले. महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या तीन हजार असण्याची शक्यता आहे.

शिवेसेनेचे (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी सांगितले की .भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांच्या संदर्भात वेळोवेळी आयुक्तांना निवेदने देण्यात आली आणि आंदोलने करण्यात आली. परंतु आजही भटक्या कुत्र्यांची शहरातील दहशत कायम आहे. सकाळी, रात्री आणि दिवसभरही भटकी कुत्री कधी अंगावर येतील याचा नेम नसतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पदाधिकारी शेख महेमूद यांनी सांगितले की, शहरातील भटक्या कुत्र्यांचा उच्छाद थांबविण्याची मागणी जनतेतून होत आहे. आमच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांनीही या प्रकरणात महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. सकाळी शिकवणी वर्गास तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी, पादचारी , रात्री कामावरून परतणारे कामगार त्याचप्रमाणे दुचाकीस्वारांवर कुत्र्यांची दहशत बसलेली आहे.

जालना शहरासह जिल्ह्यातील इतर भागांतीही मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या जून आणि जुलै या दोन महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यात जवळपास साडेसहाशे व्यक्तींना कुत्र्यांनी चावे घेतल्याची अधिकृत शासकीय नोंद आहे.