नांदेड : अहमदपूर मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणार्या दोन हायवा जप्त करून पोलिसांनी सुमारे ४० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नाही.
नांदेडच्या लोहा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करून त्याची लातूरला वाहतूक केली जाते. अनेक वेळा कारवाई करूनही ही अवैध वाहतूक बिनदिक्कतपणे सुरुच आहे. गेल्या आठवड्यात लोहा महसूल प्रशासनाने सहा हायवा जप्त करताना दोन गाड्या कोणत्याही कारवाईविना सोडून दिल्या होत्या.
शनिवारी रात्री अवैध वाळूची वाहतूक करणार्या दोन गाड्या माळाकोळी पोलिसांनी अडवल्या. पोलिसांनी गाड्या अडवताच वाहनचालक फरार झाल्यानंतर या गाड्या माळाकोळी पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या. वाळूसह वाहनाची एकूण किंमत 40 लाख 50 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अवैध वाळू उपश्यामुळे शासनाचा मोठठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. वारंवार कारवाई करूनही ही अवैध वाहतूक सुरुच आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अर्थपूर्ण संबंधातून हा व्यवसाय सुरुच आहे. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिल्यानंतर थातूरमातूर कारवाई करून सर्व काही अलबेल असल्याचे भासवले जात आहे. माळाकोळी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला असला तरीही हायवा चालक व मालक यांना अटक करण्याचे धाडस दाखविले नाही.