परभणी: रानडुक्कर, काळवीट आणि नीलगायी अशा वन्य प्राण्यांची शिकार करून अवैधरित्या मांस विक्री केल्या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने कारवाई करत दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियमांतर्गत शुक्रवारी (दि.१८) गुन्हा दाखल करण्यात आला.
याविषयी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मांडाखळी परिसरात काही लोक वन्य प्राणी रानडुक्कर, काळवीट आणि निलगायीची मांस विक्रीकरीता शिकार करीत असल्याची गुप्त माहिती वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयास मिळाली. यावरून सापळा रचत गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहरातील जगदीपसिंग जीवनसिंग टाक आणि सावंणसिंग स्वरणसिंग टाक यांच्यावर इंद्रायणी माळ परिसरात छापा टाकून त्यांनी अवैधरित्या वन्य प्राणी रानडुक्कराचे १५ किलो मांस आणि वन्य प्राणी काळवीट मादी तसेच निलगायीची शिकार करतांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी रात्री उशिरा आरोपींचे जवाब घेऊन त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय वन अधिकारी डॉ.राजेंद्र नाळे, सहायक वन संरक्षक जीपी ढगे यांच्या मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे, वनपाल एआय आयनिले, बीव्ही सुर्यवंशी, वायएम शिंदे, व्हीएन बुचाले, केएम थोरे, वनरक्षक आरडी खटींग, शिंगारे, डिजी कोल्हेवाड, जीएम कुर्हा, शिवाजी शिंदे यांनी मिळून केली. या कार्यवाहीत पशुधन विकास अधिकारी पेडगाव येथील डॉ.अब्दुल अजीज यांना मादी काळवीटाच्या उत्तरीय तपासणीमध्ये बंदुकीची एक गोळी आढळून आली. या प्रकरणीत पुढील तपासासाठी वन्य प्राण्यांचे नमुने न्यायवैधक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे हे करीत आहेत.