राहाता: ‘ग्रो मोअर’ कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अनेक भागांतील गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा सखोल तपास करून कठोर कारवाईच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. यामध्ये शिर्डी संस्थानामधील कर्मचाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. काही कर्मचारीच कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याचे उघड झाल्याने या कर्मचाऱ्यांनी भाविकांची फसवणूक केली का, याचाही तपास करण्याची सूचना पोलिसांना दिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
मंत्री विखे यांनी शिर्डी येथे वरिष्ठ पोलीस व महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली.
विखे म्हणाले, केवळ चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने तीनशे ते चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुंतवणूकदारांच्या पैशातून कंपनी प्रतिनिधींनी जमीनखरेदी-विक्रीचे व्यवहार केले असतील, तर त्याची चौकशी करून असे व्यवहार तातडीने थांबविण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल.