रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील तनाळी राधाकृष्णवाडी येथे वस्तीत शिरलेला बिबट्या एका घराच्या मागे असलेल्या विहीरीत पडला. त्याला विहिरीतुन सुरक्षित बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

तनाळी राधाकृष्णवाडी येथे राहात असलेले सहदेव बाईत यांच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्या असल्याचे सनवी सुरज बाईत यांनी पाहिले. याची माहिती पोलीस पाटील राजेश थरवळ यांना देण्यात आली. त्यांनतर ही माहिती वन विभागाला देण्यात आली.

वन परिमंडळ अधिकारी चिपळूण एस. एस. सावंत, दत्ताराम सुर्वे, वनरक्षक रामपूर राहूल गुंठे, वनरक्षक अनंत मंत्रे, व वाहनचालक नंदकुमार कदम, संजय अंबोकर या वन विभागाच्या बचाव पथकाने सामग्री व पिंजऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
विहिरीतुन बाहेर काढण्यात आलेला बिबट्या व वन विभागाचे पथक. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बिबट्याला विहीरीमधून बाहेर काढल्यानंतर बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी श्री. कणसे यांनी तपासणी केली. हा बिबट्या मादी जातीचा असून त्याचे अंदाजे वय दोन ते अडीच वर्षे असल्याचे सांगितले. बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांचे समक्ष नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.