रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-पांगरी येथे गाव पऱ्याजवळ गुरूवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या बिबट्याच्या शरीरावर जखमा आढळल्याने वन विभागाने दोन बिबट्यांच्या झटापटीत याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविला आहे.
देवरूख-पांगरी गावचे रहिवासी सुहास जोशी हे जवळच असलेल्या धरणाकडे पायवाटेने जात होते. यावेळी त्यांना पायवाटे शेजारी मृत बिबट्या दिसून आला. याविषयी त्यांनी गावचे सरपंच सुनील म्हादे यांना माहिती दिली. म्हादे यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली.
वनविभागाचे संगमेश्वरमधील प्रभारी वनपाल न्हानू गावडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जावून मृत बिबट्याची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत या बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे कारण स्पष्ट होईल असे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. या बिबट्यावर वनविभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले. हा बिबट्या दोन वर्षाचा नर जातीचा होता.