सांगली : हॉटेलमध्ये नाष्टा करत असतानाच एक वृद्ध महिला खुर्चीवरून अचानक खाली कोसळली. सोबत असलेल्या नातेवाईकांना काही सुचण्यापुर्वीच तिच्या हृदयाची धडधड थांबली. याच वेळी एनसीसीमधील शिबीरात सीपीआरचे प्रात्यक्षिक केलेला युवक पुढे आला. त्याने प्रसंगावधान दाखवत वृद्ध महिलेच्या बंद पडलेल्या हृदयाची टिकटिक पुन्हा सुरू केली. हा युवक होता तासगाव तालुक्यातील लोंढे या गावचा संतोष पाटील! आणि हॉटेल होतं, सोलापूर जिल्ह्यातील कामती येथील.
सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेणारा संतोष पाटील हा शुक्रवारी पथसंचलनासाठी बेगमपुरहून निघाला होता. कामती गावात एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबला. दुपारी अकरा वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये नाष्टा घेण्यासाठी थांबलेली ५८ वर्षांची महिला हृदयविकाराचा झटका आल्याने अचानक कोसळली. वेदनेने काही काळ तडफडली आणि काही क्षणातच सगळे शांत झाले. तिच्या हृदयाचे ठोके थांबले होते. आजूबाजूची मंडळी काय करायचं? या विवंचनेत असतानाच कुणी नाकाला कांदा लावा, डाव्या पायाचे चप्पल हुंगायला द्या, असा तर कुणी तात्काळ डॉक्टरांना बोलवा अशी साद देत होते, तर कुणी महिलेला वारे घालण्याचा प्रयत्न करीत होते.
हेही वाचा : “…तर युतीत फूट पडायला वेळ लागणार नाही”, शिंदे गटातील नेत्याचा भुजबळांना इशारा
बाजूला उभा असलेला संतोष पुढे सरसावला. या महिलेच्या छातीवर दाब देत त्याने एनसीसी परेडमध्ये प्रात्यक्षिक केलेल्या सीपीआरचा उपयोग केला. काही काळानंतर या महिलेच्या हृदयाची टिकटिक पुन्हा सुरू झाली. शुद्धीवर आलेल्या महिलेला तात्काळ रूग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले. काळ आला होता, पण संतोषने मिळालेल्या अल्प ज्ञानाच्या जोरावर परतून लावला.