सांगली : सांगली-मिरज शहरांना जोडणारा कृपामयी रेल्वे पूलाला पर्याय म्हणून नवीन सहापदरी पूल तयार होणार नाही तोपर्यंत सध्याच्या पूलावरून सुरू असलेली वाहतूक बंद ठेवता येणार नाही, असे रेल्वे विभागाला ठणकावून सांगण्यात आले असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. कृपामयी पूलाची स्थिती अवजड वाहतूकीसाठी सक्षम नसल्याने वाहतूक बंद ठेवावी असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. यावर विचार करण्यासाठी पालकमंत्री खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीस खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्यासह रेल्वे, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सांगली व मिरज या शहरांना एकमेव वाहतुकीचा मार्ग असताना रेल्वे विभागाने या पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट यापुर्वी का केले नाही. पूल धोकादायक झाल्याची बाब आताच कशी लक्षात आली? पर्यायी मार्गाचा विचार न करता अचानकपणे अवजड वाहतूक बंद करण्याची रेल्वे विभागाने सूचना कोणत्या आधारावर केली? असा सवाल यावेळी रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांना विचारला.

हेही वाचा : “मोठी जात संपवण्याचा…”, मनोज जरांगेंचा भाजपावर रोख? म्हणाले, “देशातल्या अनेक राज्यांमध्ये…”

या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करणे लोकांच्यादृष्टीने अन्यायकारक ठरेल. पूलाची तात्पुरती दुरूस्ती आठ दिवसांत करावी, या कालावधीत अवजड वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग निश्‍चित केला जाईल. मात्र, दुरूस्तीनंतर कायमस्वरूपी सहापदरी पूलाची उभारणी करण्यात यावी अशी सूचना यावेळी मांडण्यात आली.

हेही वाचा : सांगली : खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याचा अधिसभेत ठराव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात मंगळवारी मुंबईमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रेल्वे अधिकार्‍यांशी बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे खा. पाटील यांनी यावेळी सांगितले. नवीन सहापदरी पूलाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करून रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्यासमोर मांडण्यात येऊन हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही खा. पाटील यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत रेल्वेच्या अधिकार्‍यांची हुकुमशाही प्रवृत्ती सहन केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.