अहिल्यानगर : प्रसिद्ध शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने मानधनावर पुजारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुजाऱ्यांना भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम स्वीकारता येणार नाही तसेच हवनसाठी देवस्थान आता ११ हजार रुपयांची पावती भक्तांकडून घेणार आहे. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांनी ही माहिती दिली.
देवस्थानकडे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या पुजाऱ्यांना आजपर्यंत भक्तांकडून दक्षिणा मिळत होती. आता या पद्धतीत बदल करून पुजाऱ्यांना मानधनावर नियुक्त करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. देवस्थानच्या पुजाऱ्यांनीही तसा मागणी अर्ज विश्वस्त मंडळाकडे केला होता. पुजाऱ्यांची मानधनावर नियुक्ती करताना नियम व अटी घालून नियुक्ती देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी काल, शनिवारपासून सुरू करण्यात आल्याचे दरंदले यांनी सांगितले.
या पुजाऱ्यांना ३१ हजार रुपये व २१ हजार रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे. पहाटे ४ ते रात्री १०.३० या कालावधीत दोन पाळ्यांमध्ये पुजाऱ्यांनी सेवा द्यायची आहे. पुजाऱ्यांनी भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम करायची नाही. एवढे करूनही भाविक पुजाऱ्यांना दक्षिणा देत असतील तर पुजाऱ्यांनी ती रक्कम न स्वीकारता तेथील दानपात्रात टाकण्यासाठी भाविकांना मार्गदर्शन करायचे आहे. तसेच कोणी भक्त पुजाऱ्यास वस्तू स्वरूपात दान देणारा असेल तर त्या वस्तू पुजाऱ्याने न स्वीकारता देवस्थानच्या देणगी विभागाकडे जमा करून रितसर वस्तुरूपाने पावती घेण्यासाठी भाविकांना मार्गदर्शन करायचे आहे.
पुजेचे सामान, पुजारी, दक्षिणा देवस्थानचे दर मिळून देवस्थान ११ हजार रुपयांची पावती हवनसाठी भक्तांकडून घेणार आहे. त्यापैकी सामान व दक्षिणेचे मिळून ५ हजारांची रक्कम पुजाऱ्यास देवस्थानकडून स्वतंत्रपणे दिली जाईल. पुजाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत ड्युटीवर असताना मोबाईल बाळगणे व वापरावर बंदी राहणार आहे.
एक हजार रुपयांपुढील देणगीदारांकडून अभिषेकासाठी अभिषेक शुल्क देवस्थान आकारणार नाही. ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांना अभिषेकासाठी देवस्थानचे शुल्क आकारले जाणार नाही. परंतु, इतर सर्व भाविकांना अभिषेकासाठी देवस्थानचे १०० रुपयांची पावती घेऊनच अभिषेक करायचा आहे.
शनैश्वर देवस्थान गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी गाजत आहे. देवस्थानच्या कारभाराचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार देवस्थानच्या कामकाजाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला असून, त्याचाही तपास सुरू आहे.