अहिल्यानगर: श्रीरामपूर येथील भर न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच वकिलावर हल्ला करण्याची खळबळजनक घटना आज, बुधवारी घडली. या घटनेत वकील दिलीप दत्तात्रय औताडे (वय ४४) जखमी झाले. त्यांच्या डोळ्याला व डोक्याला मार लागला. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते.
यासंदर्भात माहिती देताना जखमी वकील दिलीप औताडे यांनी पत्रकारांना सांगितले की, वरिष्ठ न्यायाधीश आर. बी. गिरी यांच्यासमोर कौटुंबिक प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अमरावती येथील अभिजीत पाथरकर यांच्या विरोधात उलट तपासणी सुरू होती. ते मध्ये बोलत होते. त्यावेळी न्यायाधीशांनी त्यांना, तुम्ही तुमची केस चालवणार का? तुम्हाला याची माहिती आहे का? असे विचारले. त्यावर त्याने वकिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्न लिहून आणले आहेत, असे सांगितले. वकिलांनी आपल्याला नोटीस पाठवली व वीस लाख रुपये मागितल्याचेही तो सांगत होता. वकिलाविरोधात अरेरावीची भाषा त्याने सुरू केली.
त्यावर उपस्थित वकिलांनी त्याला व्यवस्थित बोलण्यास सांगितले. त्यानंतर काही कळण्याच्या आतच त्याने आपल्यावर हल्ला चढवला व गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचे वकील औताडे यांनी सांगितले. हा प्रसंग पाहून उपस्थित लोक औताडे यांच्या मदतीला धावले व औताडे यांची सुटका केली. पोलिसांनी अभिजीत पाथरकर यांना ताब्यात घेतले.
वकील संघाची आज बैठक
भर न्यायालयात सुनावणी सुरू असताना झालेला हल्ला निंदनीय असून, याबाबत उद्या, गुरुवारी वकील संघाची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत. शासनाने वकील संरक्षण कायदा लागू करावा, अशी वकील संघाची मागणी आहे. – अरूण लबडे, अध्यक्ष, श्रीरामपूर वकील संघ.