नांदेड/जालना: गेल्या २४ तासात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी असे दोन दिवस ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मुखेड शहरालगत असलेल्या वसूर येथे महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने ती मृत्यूमुखी पडली तर एका म्हशीचा मृत्यू झाला.

सायंकाळच्या सुमारास शेषाबाई कामीन शिंदे (वय ६५) ही महिला शेतातील कामे आटोपून घरी परतत होती. अचानक पाऊस सुरु झाल्याने तिने एका झाडाचा आसरा घेतला. त्याचवेळी वीज कोसळून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

बुधवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर गुरुवार (दि.१५) माहूर तालुक्यात दुपारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने करंजी येथे संजय कृष्णकुमार पांडे (वय ५५) या शिक्षकाचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. तर शेतात जनावरांना चारा घालणारे अमरसिंग चव्हाण (वय ५५) हे जखमी झाले.

विदर्भातील करंजी येथील संजय पांडे हे शिक्षक आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून माहूर येथे येत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. त्यात अंगावर वीज पडल्याने पांडे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी माहूर पोलिसांनी धाव घेतली. कायदेशीर सोपस्कार व उत्तरीय तपासणीनंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथे बाजीराव दांडगे (वय ५५) यांचा वीज पडून गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. बाजीराव दांडगे हे त्यांच्या बाजरीच्या शेतात काडी कचरा पेटवत असताना अचानक पाऊस सुरू झाला. याचवेळी वीज कोसळली.