वाई: साताऱ्यात  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. सर्व मल्लांनी खिलाडू वृत्तीने मैदान गाजवावे असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले.  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सातारा तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेला मंगळवारी संध्याकाळी सुरवात करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ,सहकार  व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई,यावेळी कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, सातारा तालिम संघाचे संस्थापक साहेबरावभाऊ पवार, धनाजी फडतरे, अमोल बुचडे, बलभीम शिंगरे, दीपक पवार, संदीप साळुंखे, जिल्‍हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल आदींच्या उपस्थितीत आज  ६४व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

  कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने साताऱ्यातील शाहू स्टेडियमला वेगळी झळाळी आली आहे.आज उदघाटना दिवशी ५७,७० आणि ९२ किलो वजनी गटातील कुस्त्या करून सुरवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आज शुभारंभाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. सुधीर पवार यांनी प्रास्ताविक केले.या आखाड्यात राज्यभरातून ९०० मल्ल ११० प्रशिक्षक पंच सहभागी होणार आहेत.या स्पर्धेसाठी राज्यभरातून कुस्ती शौकिन उपस्थित राहतील असे सांगण्यात आले.

   कुस्ती खेळणाऱ्यांना मदत करुन चालणार नाही तर ज्यांनी आपलं आयुष्य कुस्तीसाठी घालवल अशा सेवानिवृत्त कुस्तीगिरांना मदत शासनाने केली पाहिजे. त्यांना पद दिले गेले पाहिजे. शासनाला हा निर्णय घ्यायला लागणार आहे असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा अशी ज्येष्ठ नेते शरद पवारांची इच्छा होती आणि त्यांच्या आग्रहावरून साताऱ्याला ही स्पर्धा होत आहे.

 शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 1962 साली झाली होती. त्यानंतर आता शरद पवार साहेबांच्या मान्यतेने सातारा जिह्याला बहुमान मिळाला आहे. डोळ्याचे पारणे फिटेल अशा कुस्त्या पहायला मिळणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने संपूर्ण सहकार्य या स्पर्धेला राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.जिथें कोच नाही तिथें तालीम नाही. मी हे अधिवेशन सगळ्यांच्या सहकार्याने पार पाडेन, असे साहेबराव पवार यांनी सांगितले. सुधीर पवार यांनी सुत्रसंचालन केले. बाळासाहेब लांडगे यांनी आभार मानले.