सरकार कोणतेही असले तरी दलितांवरील अत्याचार थांबणार नाही. खैरलांजी घटनेनंतर दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये ३५ टक्के वाढ झाली. अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक असावा, असे सांगतानाच दलित अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पातळीवर गठित समित्या राजीनाम्यानंतर स्थापन झाल्याचा दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला.
काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी कवाडे यांच्या सभा आयोजित केल्या होत्या. तत्पूर्वी पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरशी करताना कवाडे म्हणाले की, हिटलरही निवडून आला होता. मात्र, नंतर तो हुकूमशहा झाला. मोदींचेही तसेच होईल. संसदीय लोकशाहीची काळजी असल्यामुळे हे दाखविले जाणारे चित्र चुकीचे वाटले. त्यामुळे काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिल्याचे प्रा. कवाडे यांनी स्पष्ट केले.
खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना शिक्षा व्हावी असे वाटत होते. तेव्हा आरोपींना अटक करण्यात पोलीस टाळाटाळ करीत होते. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ राजीनामा दिला होता. मात्र, धर्मनिरपेक्ष मतांमध्ये दुफळी निर्माण होऊ नये, म्हणून आपण आघाडीची संगत केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान लादण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. खासदार निवडून येण्याआधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करून भाजपने आगाऊपणा केला आहे. ते एकाधिकारशाहीचे द्योतक आहे. मोदींना लादणे ही गंभीर बाब असल्याचे मत प्रा. कवाडे यांनी व्यक्त केले.