ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मागील आठवडय़ात आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या व पत्रांमुळे त्यांची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून नगर जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी मंगळवारी राळेगणसिध्दीत येऊन सुरक्षेचा आढावा घेतला.
हजारे यांना मागील महिन्याभरापासून राष्ट्रवादीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार पद्मसिंह पाटिल यांच्या मतदारसंघातून दूरध्वनी व पत्राव्दारे तुमचा पवनराजे करू यासह इतर धमक्या येत होत्या. या पार्श्र्वभूमीवर नगरचे पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी राळेगणसिध्दीत येऊन अण्णांशी सुमारे चाळीस मिनिटे चर्चा केली. नंतर अण्णांचे कार्यकर्ते व सुरक्षेतील पोलिसांची एक बैठक घेऊन सुरक्षेबाबत त्यांनी सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक शरद जांभळे, अण्णांचे सहायक दत्ता आवारी, श्याम पठाडे, नाना आवारी यांच्यासह सेवक उपस्थित होते. येथील सुरक्षाव्यवस्थेचा अहवाल दररोज आपल्याकडे पाठविण्याचा आदेश शिंदे यांनी दिला आहे.