सर्जकिल स्ट्राईकनंतर अनवधानाने भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण हा आपल्या आजीच्या अस्थी विसर्जनासाठी रविवारी सकाळी नाशिकच्या रामकुंडाकडे निघाला. तत्पूर्वी, त्याच्या हातून आजीचे विधिपूर्वक अस्थिपूजन झाले.
आपला लाडका नातू चंदू भारताची सीमा ओलांडून शत्रूराष्ट्र पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या बातमीच्या कानावर पडताच चंदूच्या आजी लिलाबाई पाटील यांना तिव्र मानसिक धक्का पोहोचून त्यांचा मृत्यू ओढावला. यामुळे चंदूचे कुटुंब आणखीच खचले. चंदूचे पाकिस्तानात जाणे आणि त्याचवेळी त्याच्या आजीचे निधन होणे, या घटनांमुळे चव्हाण कुटुंबाचे मनोधर्य खचले होते. चंदूचे बालसंगोपन आजी लिलाबाईंच्या कुशीतच झाल्याने साहजिकच तो लिलाबाईंचा लाडका होता. आजींच्या अंत्ययात्रेस चंदू नसल्याने किमान तो भारतात आणि आपल्या घरी बोरविहिर येथे परतल्याशिवाय लिलाबाईंच्या अस्थिविसर्जन करायचे नाही, असे चंदूच्या कुटुंबीयांनी ठरविले आणि रविवारी चंदू चव्हाण हा कुटुंबीयांसोबत आजीच्या विसर्जनासाठी नाशिककडे निघाला. ३७ राष्ट्रीय रायफल्स’ मध्ये तनातीस असलेला जवान चंदू चव्हाण हा होळीसणाच्या तोंडावर आपल्या गावी परतल्याने अख्खे गाव आनंदात न्हाऊन निघाले. चंदूचे ढोलताशांच्या निनादात आणि डिजेवर देशभक्तीपर गीते वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले. उत्साही देशभक्तांनी फटाके वाजवून पेढे वाटप केले. ज्या रस्त्याने गावात प्रवेश करणार होता ते रस्ते सकाळीच सडा आणि रंगीबेरंगी रांगोळीने सजले होते.
पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी पाकव्याप्त प्रदेशात जाऊन भारताने लक्षभेदी कारवाई (सर्जकिल स्ट्राईक) केली आणि त्याचवेळी २९ सप्टेंबरला २०१६ ला जवान चंदू चव्हाणने नकळत भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडली होती. पाकिस्तान सरकारने आढेवेढे घेतल्यानंतर अखेर २१ जानेवारीला चंदू चव्हाण यास भारत सरकारच्या स्वाधीन केले. जवळपास सहा महिन्यानंतर चंदू चव्हाण आपल्या बोरविहिर (ता.धुळे) या गावी परतला. शत्रूराष्ट्राच्या ताब्यातून मायदेशी परतलेला चंदू आपल्या गावी येणार म्हणून त्याचे मित्र, नातेवाईक, ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्ष, समाजसेवक, संघटना यांनी आधीच येथे उपस्थिती दिली होती.
चंदूचे आजोबा चिंधा पाटील, भाऊ भूषण चव्हाण व चंदू चव्हाण यांच्यासह केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे इंदूरहून धुळ्यात आले आणि चंदू सुखरूप प्रतल्याचे समाधान व्यक्त करत या कुटुंबाने आजी लिलाबाई यांच्या अस्थिविसर्जनाची तयारी केली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे आभार मानत चंदूच्या कुटुंबीयांनी रविवारी नाशिक येथील रामकुंडावरचा लिलाबाईंच्या अस्थी विसर्जनासाठी विधिवत पूजा केली.