गडचिरोली : कोरची तालुक्यातील जामनारा येथील रासोबाई दिनेश मडावी यांच्या नवजात बाळाचा कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. नैसर्गिक प्रसूती होऊनही बालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी केला.
रासोबाई मडावीला ३० जुलैला प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला बेलघाट येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. परंतु मानसेवी वैद्यकीय अधिकारी नसल्याने परिचारिकेने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णवाहिकेने रासोबाईला कोरची येथे नेत असताना वाटेत वाहनाचा टायर नादुरुस्त झाला. रासोबाईच्या प्रसव वेदना वाढत होत्या. त्यामुळे दुसऱ्या वाहनाने तिला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर येथे प्रसूती होऊ शकत नाही, असे सांगून रासोबाईला गडचिरोलीला हलवण्यासाठी रेफर कार्ड तयार करण्यात आले. मात्र, रासोबाईला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी १०८ व १०२ क्रमांकाची दोन्ही रुग्णवाहिका नादुरुस्त होत्या. त्यामुळे रासोबाईला खासगी वाहनाने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे नवजात बाळाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रासोबाईला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेवर वाहन उपलब्ध करून दिले असते तर, बाळाचे प्राण वाचले असते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावले असल्याचा आरोप रासोबाईच्या कुटुंबीयांनी केला आहे.