सरकारने आम्हाला २ लाख रुपयांची मदत जाहीर केली. पण आता मीच भीक मागून तुम्हाला २ लाख रुपये देते, मग तुम्ही माझा नवरा परत आणाल का ?, असा संतप्त सवाल यवतमाळमधील शेतकऱ्याच्या पत्नीने विचारला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मानोली गावातील बंडू सोनुले या शेतकऱ्याचाही मृतांमध्ये समावेश आहे. सोनुले कुटुंबियांची भेट घेण्यासाठी नेतेमंडळी पोहोचत आहेत. या नेत्यांना बंडू यांच्या पत्नी गीता सोनुले यांनी संतप्त सवाल विचारला. मीच तुम्हाला भीक मागून २ लाख रुपये आणून देते, मग तुम्ही माझा नवरा परत आणाल का?, असे त्या म्हणाल्यात. सोनुले कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची असून बंडू यांच्या मृत्यूमुळे सोनुले कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

शुक्रवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोनुले कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शेतकरी न्याय आंदोलन समितीचे देवानंद पवार हेदेखील याप्रसंगी उपस्थित होते. कृषिमंत्री हे उशिरा आल्याचा आरोप करत देवानंद पवार यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर पवार आणि पालकमंत्री मदन येरावार यांच्यात खडाजंगी झाली. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरुन रविकांत दाणी यांना हटवण्यात जी तत्परता दाखवली, ती शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर का दाखवली नाही, असा प्रश्न त्यांनी पालकमंत्र्यांना विचारला. यावर पालकमंत्री येरावार यांनी तुम्ही शेतकरी आहात का, असा प्रतिप्रश्न पवार यांना विचारला. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. संतप्त कार्यकर्त्यांनी कृषिमंत्र्यांच्या कारवर कापसाचे पीक फेकून रोष व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गीता सोनुले यांच्यावर काही लोकांनी दबाव टाकला. दोन दिवसांपूर्वी भीक मागून सरकारला पैसे देते असे म्हणणाऱ्या महिलेने कृषिमंत्र्यांसमोर तोंड उघडू नये यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. कापसाला बोंडे नसून याकडे आम्ही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण पालकमंत्री मदन येरावार यांनी आम्हाला बाजू मांडू दिली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मंत्र्यांनी यवतमाळमध्ये येऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका त्यांनी केली.