जळगाव : करोना रुग्णाजवळ नातेवाईक असणे..वॉर्डबॉयची कमतरता..न्हाणीघर, खिडक्यांचे दरवाजे तुटलेले..रुग्ण हलवितांना रुग्णासोबत डॉक्टर न मिळणे यासारख्या उणिवा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना कोविड रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान दिसून आल्या. यावेळी ठेकेदारालाही त्यांनी धारेवर धरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ.अविनाश ढाकणे यांच्या बदलीनंतर गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी म्हणून राऊत यांनी कार्यभार स्वीकारला. शुक्रवारी सकाळी त्यांनी अधिष्ठाता, प्रशासक आणि अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर दुपारी कोविड रुग्णालयास भेट दिली. रुग्णालयाचा कोपरा न कोपरा त्यांनी सव्वातासाच्या दौऱ्यात पाहिला. यावेळी प्रशासक बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, डॉ. मधुकर गायकवाड, डॉ. मारुती  पोटे यांनी रुग्णालयाची माहिती दिली. डॉक्टर, परिचारिका यांची हजेरी वहीही जिल्हाधिकाऱ्यांनी तपासली. करोना सकारात्मक कक्षात जाऊन त्यांनी पाहणी केली. रुग्ण रुग्णालयातून निघून जाऊ  नये म्हणून त्यांना गणवेश देण्याची सुचना केली. ऑक्सिजन सिलिंडरची पाहणी करीत त्यांनी अतीदक्षता कक्षात खाटा वाढवून घ्या, रंगकाम करा, साधन सामग्री तयार ठेवा, वॉर्डबॉयची भरती करा, अशा सुचना दिल्या.

सिलिंडर वेळेवर का पोहोचत नाही, म्हणून त्यांनी ठेकेदारांची कानउघाडणी केली. ऑक्सिजन सिलिंडरची नोंद ठेवण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. एका कक्षात रुग्णाजवळ नातेवाईक दिसल्यावर जिल्हाधिकारी संतप्त झाले. तत्काळ त्याला बाहेर काढत नातेवाईकाना येऊ  कसे देता म्हणून परिचरिकांना, अधिकाऱ्याना विचारणा केली.

खिडक्या, न्हाणीघराचे दरवाजे तुटलेले दिसल्याने त्यांनी तत्काळ दुरूस्ती करण्यास तसेच रुग्णांसाठी मदत म्हणून २० आरोग्य स्वयं सेवकांची भरती करण्यास सांगितले. करोना तपासणीच्या चाचण्या वाढवा, अत्यवस्थ रुग्णांनाच जिल्ह्याच्या कोविड रुग्णालयात आणावे, मृत्यूदर टाळण्यासाठी प्रत्येक रूग्णाकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, अत्यवस्थ रुग्णांची संध्याकाळी माहिती द्या, अशा सूचना वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या.

कोविड रुग्णालयातून संशयित रुग्ण बेपत्ता

कोविड रुग्णालयातून ८० वर्षांचा करोना संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याचे शुक्रवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आले. यापूर्वी पहुर, ममुराबाद येथील रुग्ण बेपत्ता झाला होता. ते घरी सापडले होते. आता पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील वृद्ध बेपत्ता झाला आहे. या रुग्णाचे स्त्राव तपासणीसाठी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे. परिचारिकांनी सकाळी पाहणी केली असता रुग्ण आढळून आला नाही. तातडीने अन्य कक्षात चौकशी केल्यानंतर ओटय़ाखाली, स्वच्छतागृहांमध्ये तपासणी करण्यात आली. कोविड रुग्णालयातून यापूर्वी वृद्ध महिला बेपत्ता झाली होती. या महिलेचा आठ दिवसांनी रुग्णालयातच मृतदेह आढळून आला होता.

रूग्ण बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर प्रत्येक रुग्णाला गणवेश, त्यावर पॉझिटिव्ह संशयित असा उल्लेख आणि प्रत्येकाच्या हातावर शिक्का असे नियोजन करा, किती रुग्ण, किती गणवेश लागतील, कोण शिवून  देणार याबाबत माहिती द्या, अशा सूचना प्रशासक डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या. रूग्ण पळून जात असतील आणि सापडत नसतील तर रुग्णालयात सुरक्षा पुरविणाऱ्या सुरक्षा एजन्सीवर गुन्हे दाखल करा, अशा सूचनाही डॉ. पाटील यांनी दिल्या,

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of covid hospital revealed several problem before the district collector zws
First published on: 20-06-2020 at 03:40 IST