सातारा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आवाजाच्या भिंती (डॉल्बी यंत्रणा) पोलीस यंत्रणेच्या रडावर आहेत. मात्र ही डॉल्बी यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मर्यादित डेसिबलमध्येच वाजली पाहिजे. त्या आवाजाचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये. हा उत्सव श्रद्धेचा उत्सव आहे. उगाच डॉल्बी लावण्याच्या अहमहमिकेमध्ये विनाकारण दुर्घटनेला आमंत्रण दिले जाऊ नये अशी रोखठोक प्रतिक्रिया सातारा जिल्हा डॉल्बी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व पालिकेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली आहे.
गणरायाच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील एका गणेशोत्सव मंडळाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कठोर कारवाई केली. एकूणच डॉल्बी या ध्वनिवर्धक यंत्रणेच्या विरोधात समाजमनाचा सूर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर डॉल्बी संघटनेचे नक्की काय म्हणणे आहे, त्या संदर्भाने संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज शेंडे यांनी आपल्या रोखठोक भावना प्रकट केल्या.
मनोज शेंडे म्हणाले, की गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव आहे. गणपती उत्सवानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वर्षभर गणपती वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी ठेवतात. मात्र मंडळाचे कार्यकर्ते कमी आणि गणपती उत्सवांमध्ये नाचणारे हौसे गौसे जास्त असतात. वर्षभर गणपती आहे तिथे कधी तरी भक्तिभावाने गणराय वंदना होते का?मग राजवाड्यावर डॉल्बी वाजवायची आणि गणराया आगमनाची मिरवणूक काढायची. त्याचा त्रास सर्वसामान्य सातारकरांना होतो. प्रबोधनातून आपली श्रद्धा प्रकट करायची असते.
ते पुढे म्हणाले, की सातारा जिल्ह्यामध्ये साडेचारशेपेक्षा अधिक डॉल्बी यंत्रणेचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने डॉल्बी किती डेसिबलमध्ये वाजवायची याचे दिलेले कायदे कोणीही मोडता कामा नये. डॉल्बीचा आवाज हा निवासी क्षेत्रामध्ये ५५ डेसिबलच्या आतच असला पाहिजे. गणरायाच्या आगमन आणि विसर्जन सोहळ्यामध्ये सातारकरांनी सहभागी झाले पाहिजे.
गणेशोत्सव हा सामाजिक भान देणारा उत्सव आहे. त्याचेच भान ठेवून मंडळांनी आवर्जून पालन करावे, असे आवाहन शेंडे यांनी केले आहे.