शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

 पुणे : ‘आतापर्यंत शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमाचा चांगला वापर होत असल्याचे दिसून आले आहे. शिक्षणामध्ये डिजिटल माध्यमाचा वापर वाढण्यासाठी राज्यातील सर्व शाळांना इंटरनेट आणि वायफायने जोडले जाणार आहे,’ असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी सांगितले.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषदेच्या ‘दीक्षा’ या अ‍ॅपवरील ‘महाराष्ट्र इन—सव्‍‌र्हिस टीचर्स र्सिोस अ‍ॅप’(मित्र २.०) हे मोबाइल अ‍ॅप तावडे यांच्या हस्ते सादर करण्यात आले. शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व बालभारतीचे संचालक सुनील मगर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे आदी या वेळी उपस्थित होते. मित्र अ‍ॅपमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दृकश्राव्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध आहे.

‘दृश्य माध्यमांमध्ये मोठी ताकद आहे. ऐकल्यापेक्षा पाहिलेले लक्षात राहते. मोबाइलद्वारे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य शिक्षण सहजगत्या मिळू शकते. पूर्वी शिक्षकांना वर्गात मोबाइल नेण्यास बंदी होती. मात्र, शिक्षकांना वर्गात मोबाइल वापरण्यास परवानगी दिल्यानंतर शिक्षकांनी मोठय़ा प्रमाणावर अ‍ॅप तयार केली. शासनाने कोणताही निधी न देता या शिक्षकांनी स्वखर्चाने, स्वत:च्या ज्ञानाआधारे अ‍ॅप विकसित केली. राज्यातील शिक्षकांनी दहा हजारहून अधिक अ‍ॅप विकसित केली. आज राज्यातील १ लाख ६० हजारहून अधिक शिक्षक तंत्रस्नेही आहेत. डिजिटल शाळांसाठी शिक्षकांनी सुमारे ३८० कोटींचा निधी जमवला. त्यात धुळे जिल्हा आघाडीवर आहे,’ असे तावडे यांनी सांगितले.