धरणात पाणी पण शेतीला नाही ही गत आहे रायगड जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २७ वर्षे जिल्ह्य़ातील ही वेदना रायगडच्या शेतकऱ्यांनी सोसली आहे. आज ना उद्या शेतीला पाणी मिळेल आणि आपली भरभराट होईल या आशेवर शेतकरी आपला चरितार्थ चालवत आहे.
रायगड जिल्ह्य़ातील पेण तालुक्यातील ५२ गावे सिंचनाखाली यावीत यासाठी हेटवणे सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. तर रोहा, पेण आणि अलिबाग तालुक्यांतील ४३ गावांतील जमिनी सिंचनाखाली याव्यात यासाठी आंबा खोरे प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. दोन्ही प्रकल्पांमधून जवळपास १२ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार होती. मात्र हेटवणे धरण पूर्ण होऊन आज १० वर्षे लोटली आहेत. तर आंबा खोरे प्रकल्पासाठी डोलवाहल बंधारा बांधून तब्बल २७ वर्षे लोटली आहेत. धरणे तर झाली मात्र शेतीला पाणी मिळू शकले नाही. ही व्यथा आहे सिंचन क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची.
शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकरी सातत्याने संघर्ष करत आले आहेत. मात्र सिंचनासाठी पाणी मिळालेले नाही. हेटवणे धरणातील पाण्यासाठी शेकाप नेते एन. डी. पाटील आणि धर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली २४ गाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर आंबा खोऱ्याच्या डाव्या तीर कालव्यासाठी श्रमिक मुक्तिदलाने आजवर अनेक आंदोलने केली आहेत. जिल्हा प्रशासनापासून ते मंत्रालयस्तरापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी कोरडय़ा आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही.
 राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे रायगडचेच आहेत. आता तरी त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
गेल्या २७ वर्षांत धरणाचे पाणी न मिळाल्याने इथल्या शेतीचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची आकडेवारीच श्रमिक मुक्तिदलाने आता जारी केली आहे. या आकडेवारीनुसार लाभक्षेत्राला पाणी न दिल्याने शेतकरी दुबार पीक घेऊ शकले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे दर वर्षी तब्बल सरासरी ८४ कोटींचे नुकसान झाले आहे. म्हणजेच गेल्या २७ वर्षांत शेतकऱ्यांचे जवळपास १५०० कोटींचे संभाव्य उत्पन्न बुडाले आहे.
तर आंबा खोऱ्याचे अतिरिक्त पाणी धरमतर खाडीतून अरबी समुद्रात वाहून गेले आहे. तर हेटवणे धरणाचे अतिरिक्त पाणी भोगावती नदीतुन समुद्राला जाऊन मिळते आहे आणि सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या या धरणांचे पाणी प्रकल्पांना विकण्याचे घाट घातले जात आहेत. त्यामुळे आता येत्या फेब्रुवारी महिन्यापासून निर्णायक संघर्षांची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे आता तरी या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहतील असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrigation agony of water resorces minister of raigad irrigation water
First published on: 21-12-2012 at 05:59 IST