राज्यातील धार्मिकस्थळं पाडव्यापासून(सोमवार)पासून उघडण्यास राज्य शासनाकडून आज परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधीपक्ष भाजपाने निर्णयाचे स्वागत केले, मात्र हा निर्णय म्हणज उशीरा सुचलेलं शहाणपणं असल्याचं म्हटलं. तर, हा निर्णय अगदी योग्य वेळेवर घेण्यात आला असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, महाविकासआघाडीतीलच एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने मात्र या निर्णयावरून राज्य सरकारवर निशाणा साधल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयावरून राज्य सरकारला प्रश्न केला आहे. ” धार्मिकस्थळं उघडण्याचा निर्णय मान्य आहे. मात्र काल-परवा मुख्यमंत्र्यांनी जोर देऊन म्हटलं होतं की दिवाळीनंतर करोनाची नवी लाट येईल आणि आज हा निर्णय? आश्चर्यकारक वाटत नाही का? हे निर्णय हेडलाइन बनवण्यासाठी आहे की काही प्रशासकीय धोरण देखील आहे?” असं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधताना राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे सूचक विधान केले होते. शिवाय, दिवाळी व दिवाळीनंतरचे १५ दिवस अतिशय कसोटीचे असणार असल्याचं म्हटलं होतं. “परिस्थिती आटोक्यात आलेली असं वाटत असलं तरी दिवाळी आणि दिवाळीनंतरचे पंधरा दिवस हे आपल्याला अत्यंत कसोटीचे असणार आहेत. पाश्चिमात्य देशात पुन्हा संख्या वाढत आहेत. आकडेवारी पाहिली तर मी म्हणेन ही लाट नाही त्सुनामी आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी आता धार्मिकस्थळं उघडण्याच्या निर्णयावर राज्य सरकारला प्रश्न विचारल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राज्यातील धार्मिकस्थळ सोमवारपासून सुरू होत असल्याची माहिती देताना, मुख्यमंत्र्यांनी हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असं म्हटलं आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास आतापर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती. या मुद्यावरून भाजपाने आक्रमक धोरण स्वीकारले होते. शिवाय, वारकरी संप्रदायामध्येही सरकारबद्दल नाराजी वाढत होती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is this decision to make headlines or is there some administrative policy sanjay nirupam msr
First published on: 14-11-2020 at 18:18 IST