तक्रार नोंदवण्यात महाराष्ट्रातील ग्राहक देशात अग्रस्थानी!

अमरावती : राज्यातील ग्राहकांच्या चोखंदळपणामुळे तक्रारींचेही प्रमाण वाढत चालले आहे.  केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक क्रमांकावर (नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन) सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला आहे. ग्राहकांची जागरूकता वाढल्याचेही हे निदर्शक मानले जात आहे.

maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात देशात एनसीएचकडे २ लाख ७५ हजार ६४१ तक्रारी टेलिफोनवरून प्राप्त झाल्या. एनसीएचच्या संकेतस्थळावर १ लाख ५८ हजार ६२४ ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या. याशिवाय एसएमएस, मोबाईल अ‍ॅप, पोर्टल आणि पत्रांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली. त्यातील सर्वाधिक ६३ हजार १३५ तक्रारी महाराष्ट्रातून (१३.८८ टक्के), उत्तर प्रदेशातून ६२ हजार ९०१ (१३.८३ टक्के) आणि दिल्लीतून ५८ हजार ४७ (१२.८ टक्के) नोंदवण्यात आल्या. यातील २३ टक्के तक्रारी या सदोष उत्पादनांच्या बाबतीत आहेत.

टेलिफोन सेवा, ई- कॉमर्स, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि बँकिंग सेवेच्या संदर्भातही तक्रारींचा ओघ मोठा आहे. ग्राहकांच्या हक्कांबाबत सरकारतर्फे ‘जागो ग्राहक जागो’ ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्राहकांच्या तक्रारींची दखल, मार्गदर्शन आणि समुपदेशनासाठी सरकारने राष्ट्रीय ग्राहक क्रमांक (हेल्पलाईन) सुरू करण्यात आली. १८००-११-४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ग्राहकांना तक्रारी नोंदवता येऊ शकतात किंवा एनसीएचच्या संकेतस्थळासह इनग्राम पोर्टलवरही तक्रार पाठवता येऊ शकते.

महिलांचे प्रमाण कमी

२०११-१२ मध्ये देशांतर्गत तक्रारींमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा तर वाटा हा १३.८२ टक्क्यांचा होता. गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांमध्ये जागरूकता वाढून उत्पादनांबद्दल मूल्यमापनाची व्यवस्था उभी झाली आहे. विशेष म्हणजे, १० ते १५ हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींकडून सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्याचे पाहणीत उघड झाले आहे. महिला खरेदीच्या बाबतीत पुरुषांपेक्षा अधिक चोखंदळ असतात, असे बोलले जात असताना तक्रारींच्या बाबतीत मात्र महिलांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तक्रार करणाऱ्या एकूण ग्राहकांमध्ये महिलांचे प्रमाण ७ ते ८ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे.  ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेणे, त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन देणे आणि संबंधित कंपन्यांनी संपर्क साधून तक्रारींचा निपटारा करणे ही एनसीएचची कार्यपद्धती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांमधील जागरूकता वाढल्याने एनसीएचच्या तक्रार नोंदणीत त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. ग्राहक मंचाचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध असला, तरी त्वरित मार्गदर्शनासाठी या सेवेचा उपयोग होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या सेवाबाबत दाद मागा

एलपीजी, वीजपुरवठा, टेलिकॉम, बँकिंग, विमा, क्रेडिट कार्ड, वाहन विक्री, टपाल, कुरिअर सेवा, पाणी पुरवठा, वाहतूक, शिक्षण, वैद्यकीय सेवा इत्यादी सेवांच्या बाबतीत त्रास झाल्यास ग्राहकांना दाद मागता येते. सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांचा निब्बरपणा वाढल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठीही अनेक कंपन्या टाळाटाळ करतात. ग्राहकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. ‘राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन’ त्यासाठी दिलासादायक ठरू लागली आहे.