नगर : केंद्रीय आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ अहवालात जैन समाजातील नागरिक मांसाहार करीत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालामुळे जैन समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. जैन समाज हा अिहसेचा पुरस्कर्ता आहे. केंद्राचे हे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आक्षेप घेत, सकल जैन समाजाच्या वतीने जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी निषेध केला आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल प्रसृत केल्यानंतर जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भगवान महावीरांची ‘जियो और जिने दो’ ही शिकवण आचरणात आणण्याचे काम समाजाने नेहमीच केले आहे.  जगात जैन समाज शाकाहारासाठी नावाजला जातो. असे असताना केंद्र सरकारचा हा अहवाल समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचे फिरोदिया यांनी नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 शेकडो वर्षांपासून जैन समाज आपली संस्कृती व परंपरा जपत आला आहे. अतिशय शांततामय मार्गाने व्यापार, व्यवसाय करून देशाच्या प्रगतीत समाज योगदान देत आहे. असे असताना केंद्र सरकारचा आरोग्य विभाग दिशाभूल करणारा अहवाल प्रसृत करीत असेल तर ते अतिशय वेदनादायी आहे. केंद्र सरकारने तातडीने हा अहवाल मागे घ्यावा. सर्वेक्षण करताना किती जैन कुटुंबांना संबधितांनी भेटी दिल्या, असा प्रश्नही फिरोदिया यांनी उपस्थित केला आहे.