जळगाव : सातपुडा पर्वताच्या सान्निध्यामुळे लाभलेली विपुल वनसंपदा आणि तापीसह गिरणा, वाघूर, बोरी, अंजनी यांसारख्या नद्यांमुळे जळगाव जिल्हा कृषी आणि औद्याोगिक विकासाच्या जोरावर सातत्याने प्रगती करत आहे. कृषी तसेच औद्याोगिक उत्पादनांच्या निर्यातीमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली.
रेल्वेसह विमानसेवा आणि महामार्गांचे जाळे विस्तारल्यामुळे देशातील सर्व प्रमुख शहरांशी जोडले गेल्याने जळगावने कृषी प्रक्रिया उद्याोगांबरोबर पाईप, चटई, रसायने, कापड उत्पादनात आणि निर्यातीत आघाडी कायम राखली आहे. सोने आणि चांदीची बाजारपेठ तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या बहुतेक सर्व प्रमुख नद्यांवर सिंचन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यातून हंगामावर मिळणाऱ्या पाण्याच्या आवर्तनांवर शेतकरी केळीसह कापूस, ऊस, मका, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, बाजरी, गहू आदी पिके घेतात. लिंबू, चिकू, मोसंबी, सीताफळ, बोरे यांच्याही फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. अर्थात, जिल्ह्याचे अर्थकारण हे प्रामुख्याने केळी आणि कपाशी या पिकांवरच अवलंबून असते. इराक, इराण, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि ओमान या देशांमध्ये होणाऱ्या केळी निर्यातीत जिल्ह्याचा मोठा वाटा असतो. जळगावात दरवर्षी सुमारे साडेपाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होते. कापसावर प्रक्रिया करणारे १०० पेक्षा जास्त जिनिंग उद्याोग जिल्ह्यात कार्यरत आहेत.
चार वर्षांच्या कालखंडात सुमारे १२ हजार ४०० कोटी रुपयांची कृषी आणि औद्याोगिक क्षेत्रातील विविध उत्पादनांची निर्यात जिल्ह्यातून झाली आहे. ज्यामध्ये कृषीवर आधारित प्रक्रिया उद्याोगांनी पाच हजार कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. प्लास्टिक, कापड आणि रसायनांचे उत्पादन करणाऱ्या उद्याोगांनीही निर्यातीत सातत्य राखले आहे. ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला चालना मिळाली. केंद्रीय कृषी मंत्रालयाने केळीसाठी समूह विकास केंद्राला (क्लस्टर) मंजुरी दिल्याने आगामी काळात भुसावळहून रेल्वेद्वारे थेट मुंबईच्या जेएनपीटी बंदरापर्यंत केळीची वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. परिणामी, केळी निर्यातीला आणखी गती मिळू शकेल.
रोजगार वाढीला चालना
मुद्रा योजनेतून बेरोजगारांना उद्याोग- व्यवसाय सुरू करण्यासाठी ३१ मार्च २०२४ अखेर सुमारे ११६८४.५५ कोटी रुपयांचे शिशू कर्ज वितरित करण्यात आले.
दृष्टिक्षेपात जळगाव जिल्हा
● भौगोलिक क्षेत्र- ११ हजार ७६५ चौरस किलोमीटर
● लोकसंख्या- २०११ च्या जनगणनेनुसार ४२ लाख २९ हजार
● दरडोई उत्पन्न- एक लाख ८२ हजार ६९६ रुपये
● साक्षरतेचे प्रमाण- ७८.२ टक्के
● दारिद्र्यरेषेखालील कुटुंब- तीन लाख १५ हजार ६०१ – शिधापत्रिकाधारकांची संख्या- २७ लाख २७ हजार ७७१
● ग्रामीण रुग्णालये- २५, दवाखाने- ३७, प्राथमिक आरोग्य केंद्रे- ७८, उपकेंद्रे- ४४२, रुग्ण खाटांची संख्या- २१३५
● सहकारी संस्था- ३७०१, प्राथमिक कृषी पतसंस्था- ८७६, जिल्हा बँक शाखा- २३७,
● राष्ट्रीयीकृत व इतर बँक शाखा- ३१५, वर्गीकृत
● जनधन योजना खाती- १४ लाख ७० हजार ७६४