‘जलजीवन योजने’त जळगावची आघाडी ; पालघर, नंदूरबार, बीड, यवतमाळ तहानलेलेच

केंद्राच्या ‘हर घल जल’ योजनेअंतर्गत सर्वच्या सर्व म्हणजे ६ लाख  ८६ हजार घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात यश आले आहे.

रेश्मा शिवडेकर, लोकसत्ता

मुंबई: ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जल जीवन’ या महत्त्वाकांक्षी योजनेत राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या  जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली असली तरी पालघर, नंदूरबार, बीड, यवतमाळ हे जिल्हे अद्यापही तहानलेलेच आहेत.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगावात केंद्राच्या ‘हर घल जल’ योजनेअंतर्गत सर्वच्या सर्व म्हणजे ६ लाख  ८६ हजार घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात यश आले आहे. त्या खालोखाल जालना, धुळे, नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील ८० टक्क्यांहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. जालना (३.८५ लाख घरांपैकी २.९८ लाख घरांमध्ये पाणी), धुळे (३.१९ लाख घरांपैकी २.९० लाख घरे), नागपूर (३.६५ लाख घरांपैकी ३.०८ लाख), कोल्हापूर (६ लाख घरांपैकी ५.०६) अशी या जिल्ह्यांची कामगिरी आहे.

मुंबईपासून काही अंतरावर असलेला पालघर जिल्हा मात्र सगळय़ात मागे आहे. आदिवासीबहुल पालघरमधील ४ लाख १० हजार घरांपैकी केवळ १ लाख ३९ हजार (३३ टक्के) घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. त्याचबरोबर नंदूरबार, बीड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड हे जिल्हेही अद्याप तहानलेले आहेत.

नंदूरबारमधील ३.०४ लाख घरांपैकी अवघ्या १.२० लाख घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईमुळे वर्तमानपत्राचे मथळे व्यापणारम्या बीडमधील ४.६९ लाख घरांपैकी अवघ्या १.९० लाख घरांपर्यंत पाणी पोहोचले आहे. तर गडचिरोलीतील २.१६पैकी ९७ हजार, चंद्रपूरमधील ३.८२ लाख पैकी १.७७ लाख, यवतमाळमधील ५.१७ लाखपैकी केवळ २.६३ लाख घरांमध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यात पुनर्विकासामुळे खासगी प्रयत्नांतून नळाद्वारे पोहोचलेल्या पाणी योजनांचाही समावेश आहे. अर्थात हे प्रमाण तुलनेत कमी आहे.

पाण्यासाठी गावागावात महिलांची आणि लहान मुलांची होणारी वणवण थांबविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी केंद्राने राज्यांच्या सहकार्याने प्रत्येकी ५० टक्के भागीदारीतून ही योजना सुरू केली. महाराष्ट्राने २ कोटी ५४ लाख घरांपैकी ६७ टक्के घरांपर्यंत पाणी पोहोचविण्यात यश मिळविले आहे. राज्यात मार्च २०१९पर्यंत ग्रामीण भागातील एकूण घरांपैकी केवळ ३८ टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचत होते.

या मोहिमेचा लाभ सर्वाधिक बिहारने घेतला. ‘बिहारमध्ये पाण्याचे स्त्रोत गावापासून जवळ आहेत. त्यामुळे केंद्राकडून आर्थिक निधी मिळताच या राज्यात योजनेने वेग घेतला. मात्र महाराष्ट्रात पाण्याचे स्त्रोत तुलनेत लांब आहेत. त्यामुळे प्रत्येक घराजवळ पाणी आणण्यास वेळ लागतो आहे,’ अशी अडचण या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील एका अभियंत्याने मांडली. मात्र गेल्या काही महिन्यात या योजनेला वेग आला असून २०२४ ऐवजी २०२३ मध्येच हे उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात योजनेला गती:

गेल्या काही महिन्यात या योजनेला वेग आला असून २०२४ ऐवजी २०२३ मध्येच हे उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास अधिकाऱ्यांनी  व्यक्त केला.राज्याच्या एकूण कामगिरीच्या (६७ टक्के) तुलनेत अधिक काम झाले आहे.

पालघरमधील जव्हार, मोखाड़ा सर्वाधिक तहानलेले

पालघरमधील जव्हार, मोखाडा, तलसरी, विक्रमगड या ठिकाणच्या रहिवाशांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही. जव्हार-मोखाडय़ातील तर अवघ्या चार-पाच टक्के नागरिकांकडेच पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. तुलनेत पालघर (शहर) आणि वसईत हे प्रमाण ५० ते ६० टक्क्यांच्या आसपास आहे.

हे जिल्हे आघाडीवर : जळगाव, जालना, धुळे, नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांबरोबरच लातुर, बुलढाणा, सोलापूर, रत्नागिरी, अमरावती, उस्मानाबाद, रायगड, सातारा, वर्धा या जिल्ह्यांमध्ये राज्याच्या एकूण कामगिरीच्या (६७ टक्के) तुलनेत अधिक काम झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jalgaon lead in jal jeevan mission yojana zws

ताज्या बातम्या