जालना – जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुखापुरी फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात मायलेकी ठार झाल्या, तर दोन गंभीर जखमी आणि सहा जण किरकोळ जखमी झाले. जालना-वडिगोद्री मार्गावर खासगी प्रवासी बस आणि मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.

या अपघातात टेम्पोमधील अंजना पुरुषोत्तम सापनर आणि अनसूया पुरुषोत्तम सापनर (रा. धानोरा, तालुका-सेनगाव जिल्हा-हिंगोली) या माय-लेकीचा मृत्यू झाला. तर, खासगी प्रवासी बसमधील विजय नेहारकर (परळी वैजनाथ), रामचन्द्र फड (कनेरवाडी), संदीप उमाजी शेपूट, यश फुलारे (शेपवाडी) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

तर, मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो वाहनातील पुरुषोत्तम नाथराव सापनर (४०), कृष्णा पुरुषोत्तम सापनर (१६), बाळू शेळके (३५) सतीश लव्हटे (३५) हे या अपघातात किरकोळ जखमी झाले. टेम्पोमधील मजूर शेतीकामासाठी बीड जिल्ह्यातून जालना जिल्ह्यातील तडेगाव (ता. भोकरदन) येथे जाण्यासाठी निघाले होते. खासगी प्रवासी बीडकडे निघाले होते.