जालना : काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या ‘दिशा’ समितीच्या बैठकीस बदनापूरचे आमदार नारायण कुचे वगळता जिल्ह्यातील अन्य आमदार आणि जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाशी संबंधित परभणीचे खासदार अनुपस्थित होते.

जिल्ह्यातील पाचही विधानसभेचे सदस्य ‘महायुती’ चे असून, खासदार डॉ. काळे काँग्रेसचे आहेत. तर परभणीचे खासदार ‘महाविकास’ आघाडीचे आहेत. यापैकी भाजपचे कुचे वगळता सर्वच लोकप्रतिनिधींची बैठकीस अनुपस्थित होती. विधान परिषदेचे जिल्ह्यातील काँग्रेसचे सदस्य आमदार राजेश राठोड बंजारा समाजाचा मोर्चा असल्यामुळे बैठकीस उपस्थित नव्हते.

केंद्र सरकारच्या विविध २२ योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचे काम यासंदर्भातील जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या (दिशा) मार्फत करण्यात येते. याबाबतीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची ही बैठक दर तीन महिन्यांनी घेण्यात येते. परंतु, सोमवारी झालेल्या या बैठकीकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातील तहसीलदार आणि जलसंपदा अधिकारी अनुपस्थित असल्याने खासदार काळे यांनी यावेळी नाराजी व्यक्त करून त्यांना नोटिसा बजावण्याचे निर्देश समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना दिले. मागील बैठकीतील काही विषय इतिवृत्तात नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलास स्वतंत्र घरकुले मंजूर केल्याचे प्रकरणही त्यांनी उपस्थित केले.

रखडलेली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची कामे, पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गुणवत्ता, पंतप्रधान आवास योजनेखाली ग्रामीण आणि शहरी भागात देण्यात येणाऱ्या अनुदानातील तफावत, स्वयंसहाय्यता बचतगटांना बँकांचा निधी मिळण्यात येणाऱ्या अडचणी इत्यादींच्या संदर्भात खासदार काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी. एम., महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीस उपास्थित होते.